Satara: कोयना, धोम जलाशयांत ॲम्फिबायस प्लेनचा उपक्रम सुरू करा, उदयनराजे भोसले यांनी केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:30 IST2024-12-12T12:29:46+5:302024-12-12T12:30:23+5:30
केंद्राने नुकतेच 'या' राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला

Satara: कोयना, धोम जलाशयांत ॲम्फिबायस प्लेनचा उपक्रम सुरू करा, उदयनराजे भोसले यांनी केली मागणी
सातारा : कोयना शिवसागर आणि धोम धरण जलाशयांमध्ये जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी उतरणारी व उड्डाण घेणारी सी प्लेनची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.
याबाबत मंत्री मोहोळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सातारा जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे. प्रचंड पर्जन्यमान आणि दुष्काळी भाग अशा विरोधीभासी वातावरणातील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण हे तालुके दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळखले जातात. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन थंड हवेची ठिकाणे लाखो भारतीय आणि परदेशी पर्यटकांना साद घालत असतात.
सातारा लोकसभा मतदारसंघातील या वैशिष्ट्यांमुळे येथे विकासात्मक पर्यटन रोजगाराची प्रचंड संधी आहे. महाराष्ट् शासनाने जावली तालुक्यातील मुनावळे या गावात जलक्रीडा पर्यटन विकास साध्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसेच शिवसागर जलाशयामध्ये जागतिक स्तरावरील जलपर्यटनाची योजनाही मंजूर केली असून, त्याचीही कार्यवाही लवकरच सुरू होत आहे.
या जलपर्यटन विकासाच्या जोडीला, सुमारे ९०० चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण शिवसागर जलाशयात आणि सुमारे २० चौरस किलोमीटरच्या धोम जलाशयात उड्डाण घेणारा किंवा पाण्यावर उतरणारा ‘सी प्लेन’ उपक्रम सुरू करण्याबाबत हवाई वाहतूक मंत्रालयाने योजना राबवावी. ॲम्फिबायस प्लेन्सचा उपक्रम राबविल्यास, या ठिकाणी आपोआप नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
केंद्राने नुकतेच मेघालय आणि आसाम राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर कोयना-शिवसागर आणि धोम जलाशयांत हा उपक्रम सुरू करावा. यावेळी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, करण यादव, आदी उपस्थित होते.