साताऱ्याचा उमेदवार ठरविण्यासाठी हेलिकॉप्टरने मुंबईला; शरद पवार गटाची जोरदार तयारी
By नितीन काळेल | Updated: March 6, 2024 18:17 IST2024-03-06T18:15:51+5:302024-03-06T18:17:13+5:30
महाविकास आघाडीची बैठक संपताच श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील मुंबईला रवाना, साताऱ्याचा उमेदवार लवकरच ठरणार

साताऱ्याचा उमेदवार ठरविण्यासाठी हेलिकॉप्टरने मुंबईला; शरद पवार गटाची जोरदार तयारी
सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापत असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेवार अंतिम करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच साताऱ्यातील महाविकास आघाडीची बैठक संपताच खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह चौघेजण विशेष हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले. यामुळे साताऱ्याचा उमेदवार लवकरच ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार हे स्पष्ट आहे. पण, आघाडीचे जागावाटप अजून झालेले नाही. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचा उमेदवार शरद पवार यांनी अजुनही जाहीर केलेला नाही. त्यातच बुधवारी साताऱ्यात महाविकास आघाडीतील पक्ष आणि समविचारी संघटनांची बैठक झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील आदींसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस कमिटीत सकाळी १० ला बैठक सुरू झाली. यावेळी सातारा लोकसभा निवडणूक जिंकण्याच्यादृष्टीने विविध मुद्दे मांडण्यात आले. तसेच काही रणनितीही ठरविण्यात आली. त्यातच या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आम्ही पत्रकार परिषदेला थांबू शकत नाही. मुंबईला बैठकीला जात असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह ते बाहेर पडले.
मुंबईला जाण्यासाठी विशेष हेलिकाॅप्टरची सोय करण्यात आली होती. या हेलिकाॅप्टरमध्ये खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि सत्यजितसिंह पाटणकर हे बसले. त्यानंतर चाैघेहीजण मुंबईला रवाना झाले. यामुळे शरद पवार गटाने सातारा लोकसभा मतदारसंघाची जोरदार तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे.