Spend 4 years for promotion of Mallakhamba | मल्लखांबाच्या प्रचारासाठी ५५ वर्षे खर्ची ; सुभाष यादव यांनी घडविले शेकडो खेळाडू
मल्लखांबाच्या प्रचारासाठी ५५ वर्षे खर्ची ; सुभाष यादव यांनी घडविले शेकडो खेळाडू

वाई : आज वाई परिसरातील शेकडो मल्लखांबपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करीत आहेत. त्याचे श्रेय निवृत्त शिक्षक सुभाष यादव यांना जाते. त्यासाठी त्यांनी अव्याहतपणे ५५ वर्षे कष्ट केले. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी मल्लखांब या महाराष्ट्राच्या मातीतील खेळाची जडलेली आवड जपली. या खेळाच्या प्रचार आणि प्रचारासाठी जिवाचे रान करून हजारो विद्यार्थ्यांना हा खेळ शिकवला.

मल्लखांब खेळासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना वेगवेगळे बहुमान मिळले आहेत. प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांना या खेळाची आवड लागली. पुढे महाविद्यालयात असताना भिडे गुरुजी व्यायाम शाळेत त्यांनी जायला सुुरुवात केली़ दरम्यानच्या काळात १९६९ मध्ये औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवात तत्कालीन क्रीडामंत्री शेषराव वानखेडे यांच्याहस्ते रौप्यपदक मिळाले. त्यानंतर महाविद्यालयीन, विद्यापीठ आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय काम करीत विविध पदके पटकावली.

दरम्यान, १९७४ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी पत्कारली. त्यावेळी त्यांनी सातारा तालुक्यातील कारी, लावंघर, करंजे, करडी, कण्हेर, आकले, लिंब गोवे तसेच बसप्पाची वाडी येथे मल्लखांबाचा प्रचार केला पुढे वाई तालुक्यात बदली झाल्यावर वाईच्या पागा तालीम तसेच किसनवीर महाविद्यालयात टीम तयार केली .

खानापूर, परखंदी, धावडी, अभेपुरी, रेनावळे, जांभळी, अनवडी, (जोशी विहीर), भुर्इंज, जांब, किकली या गावांमध्ये मल्लखांबांचा प्रचार करून हजारो खेळाडू तयार केले. या कार्याची पावती म्हणून सातारा जिल्हा परिषदेने १९८४ मध्ये ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविले. पुढे असेच कार्य चालू ठेवल्याने त्यांना विविध पुरस्करांने गौरविण्यात आले. सेवानिवृत्तीनंतरही मल्लखांब प्रशिक्षण व योग प्राणायम प्रशिक्षण देण्याचे काम शाळा-शाळांमधून, गावागावातून सुरूच आहे़ त्यामुळे शेकडो मल्लखांबपटू जिल्हा वि राज्याचे नाव कमावत आहेत.

सुभाष यादव यांनी अभेपुरी येथील प्राथमिक शाळेत असताना मल्लखांब शिकविला, पुढे जाऊन मी राज्य, राष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिके मिळविली. अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शिकवत असताना माझ्या हातून ही अनेक यशस्वी विद्यार्थी घडले आहे, याचे सर्वस्वी श्रेय यादव गुरुजींना जाते़
- विठ्ठल गोळ
आतंरराष्ट्रीय प्रशिक्षक व सचिव जिल्हा मल्लखांब असोशिएशन

आपली कला ही समाजासाठी वापरावी त्याचा प्रसार करावा़ हेतू ठेवून आजही कार्यरत आहे़ यातूनच शेकडो राज्य, राष्ट्रीय मल्लखांबपटू तयार झाले. याचा मनस्वी आनंद असून, ग्रामीण भागातही खेळाडू घडत आहेत़ हीच माझी आजवरची खरी कमाई आहे़
-सुभाष यादव, मल्लखांब प्रशिक्षक 

 

Web Title:  Spend 4 years for promotion of Mallakhamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.