पाटण वनविभाग : वणवा रोखण्यासाठी केली उपाययोजना
मल्हारपेठ : पाटण वनविभागामार्फत डोंगरात वणवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये, यासाठी वनक्षेत्रात जाळरेषा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
डोंगरातील गवत जाळल्यामुळे चांगले गवत उगवते, असा समज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा असतो. मात्र, हा चुकीचा समज असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. कारण जेव्हा गवत जळते तेव्हा त्याच्यात नवीन तयार होणारे बीदेखील नष्ट होत असते आणि बुडाशी असणारी मुळे नष्ट होऊन त्याठिकाणचे गवत नाहीसे होते, असे मल्हारपेठ वनविभागाचे वनक्षेत्रपाल भाट यांनी सांगितले. शासन शतकोटी वृक्षलागवड करताना दिसत आहे. मात्र, या झाडांचे संगोपन होताना दिसत नाही. केवळ वन विभागाने वृक्ष संवर्धनासाठी न झटता समाजातील सर्व घटकांनी आपली जबाबदारी समजून त्याचे रक्षण केले पाहिजे असे, मतही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
दरवर्षी वन विभागाकडून नोव्हेंबर महिन्यात जाळपट्टा काढला जातो. मात्र, यावर्षी पूर्ण हंगामच उशिरा सुरू झाल्याने गवत हिरवे राहिले. सर्वच विभागांत सध्या वन क्षेत्रातील जाळपट्टा काढला आहे. तरीही शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. वणवा लावल्यास कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतातील कचरा पेटवताना काळजी घ्यावी. वनाचे संरक्षण करावे, असे आवाहन वन क्षेत्रपाल भाट यांनी केले आहे.