Satara: परळीच्या महिला उद्योजिकेला राष्ट्रपती कार्यालयाचे निमंत्रण; यशस्वी वाटचालीची घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:42 IST2025-08-04T17:41:45+5:302025-08-04T17:42:53+5:30
साताऱ्यासाठी अभिमानाची बाब

Satara: परळीच्या महिला उद्योजिकेला राष्ट्रपती कार्यालयाचे निमंत्रण; यशस्वी वाटचालीची घेतली दखल
सातारा : राज्य सरकारच्या ‘उमेद’ अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर होण्याची मोठी संधी मिळत आहे. याच संधीचा फायदा घेत सातारा जिल्ह्यातील परळी गावातील महिला उद्योजिका अंजना कुंभार यांना थेट राष्ट्रपती कार्यालयाकडून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण आले आहे. ही बाब साताऱ्यासाठी अत्यंत अभिमानाची आहे.
अंजना कुंभार यांनी सहा वर्षांपूर्वी ‘जय सदगुरू कृपा’ नावाचा बचत गट सुरू केला. या गटात त्यांच्यासह एकूण १२ महिला काम करतात. मातीकाम हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्याने त्यांनी सुमारे दीड वर्षापूर्वी ‘उमेद’ योजनेअंतर्गत अल्प व्याजदरात सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाच्या मदतीने त्यांनी मूर्तिकलेच्या व्यवसायाला अधिक बळकटी दिली. सध्या त्यांच्या बचत गटाद्वारे मातीपासून विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि सुंदर कलाकृती साकारल्या जातात. या कलाकृतींची विविध प्रदर्शनांमध्ये विक्री करून हा गट आर्थिक प्रगती साधत आहे.
या यशस्वी वाटचालीची दखल थेट राष्ट्रपती कार्यालयाने घेतली असून, अंजना कुंभार यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. साताऱ्यातून या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. ‘उमेद’ अभियानामुळे ग्रामीण महिलांच्या जीवनात कसा सकारात्मक बदल घडू शकतो, याचे अंजना कुंभार एक उत्तम उदाहरण बनल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या कार्यालयाकडून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याचा खूप आनंद आहे. राष्ट्रपतींना भेटणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे अविस्मरणीय असेल. या निमंत्रणामुळे आमच्यासारख्या अनेक नवउद्योजिकांना पुढे जाण्यासाठी खरी ‘उमेद’ मिळाली आहे. - अंजना कुंभार, परळी