Savitribai Phule Birth Anniversary : अनोखे अभिवादन! क्रांतीज्योतीच्या नावाने सात्विक सावित्री लापशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 09:06 IST2020-01-03T08:56:14+5:302020-01-03T09:06:41+5:30
सावित्रीबाई फुलेंच्या गुणांवर अभ्यास करून तयार केली रेसीपी

Savitribai Phule Birth Anniversary : अनोखे अभिवादन! क्रांतीज्योतीच्या नावाने सात्विक सावित्री लापशी!
प्रगती जाधव पाटील
सातारा - स्त्री शिक्षणासाठी शेणामातीचे गोळे झेलणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शुक्रवारी (3 जानेवारी) साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने ‘सात्विक सावित्री लापशी’ ही अनोखी डिश पुण्यातील शेफने केली आहे. राज्यातील पंचतारांकित आणि जिल्ह्यातील काही निवडक हॉटेलमध्ये ही डीश उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रेसीपीचा लोकार्पण सोहळा 4 जानेवारीला पाचवड येथे होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने 4 जानेवारीला वाई तालुक्यातील पाचवड येथे ‘सातारी गावरान ठसका’ कार्यक्रम होत आहे. सह्याद्री मल्टीपर्पज हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात विस्मृतीत गेलेल्या जुन्या तब्बल 121 पाककृती सादर करण्यात येणार आहेत. यात शेवटची पाककृती ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना समर्पित केली जाणार आहे.
ही पाककृती तयार करताना सावित्रीबाई फुले यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा विचार करण्यात आला आहे. या पाककृतीतील प्रत्येक घटक हा सत्व गुणधर्म असलेला आहे. यात जात्यावर बारीक कणीसारखा भरडलेला हातसडीचा तांदूळ, गावरान गाईचे शुद्ध तुप, पाणी, सेंद्रिय गुळ, ओल्या नारळाचा खिस, हळदीचे पान यांचा समावेश करण्यात आला आहे.
साहित्यामधील प्रत्येक घटकाचे महत्व व गुणधर्म
सात्त्विक आहार हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. शुद्धता हा मुख्य गुणधर्म असणाऱ्या वस्तुंचा या रेसीपीमध्ये वापर करण्यात आला आहे. सत्वगुण दुष्ट प्रवृत्तीपासून मुक्त असतो, त्यामुळे आरोग्य ठणठणीत राहते. सावित्रीबाई फुले यांच्या याच सत्व गुणांचा विचार करून ही रेसीपी तयार करण्यात आली आहे. ही पाककृती खालल्याने शुद्धतेचा अनुभव व मनाला समाधान मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करून देण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ही रेसीपी तयार करताना अभिमान वाटला. त्यांच्याकाळी उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीसह अन्न घटकांचा वापर करून ही रेसीपी तयार केली आहे.
- रचना पाटील, पाककृतीकर्त्या