Satara: यात्रेसाठी गावी आलेल्या जवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:59 IST2025-04-19T13:58:26+5:302025-04-19T13:59:43+5:30
दहिवडी (जि.सातारा) : दानवलेवाडी (ता.माण) येथील जवान प्रशांत दिलीप कदम (वय ३५) यांचा शुक्रवारी विजेचा धक्का बसल्याने शुक्रवारी मृत्यू ...

Satara: यात्रेसाठी गावी आलेल्या जवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
दहिवडी (जि.सातारा) : दानवलेवाडी (ता.माण) येथील जवान प्रशांत दिलीप कदम (वय ३५) यांचा शुक्रवारी विजेचा धक्का बसल्याने शुक्रवारी मृत्यू झाला. प्रशांत कदम हे भारतीय सैन्य दलातील १९ मराठा लाइट इन्फंट्री या रेजिमेंटमध्ये आसाम येथे कार्यरत होते. नुकतीच त्यांची हवालदार पदी पदोन्नती झाली होती.
दानवलेवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त दहा दिवसांपूर्वी ते सुटीवर आले होते. यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवारी होता. गावकऱ्यांसह प्रशांत यांचीसुद्धा लगबग सुरू होती. यात्रेनिमित्त घरात पिण्याचे पाणी भरण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास ते घरासमोरील नळपाणी पुरवठा योजनेच्या पाइपला विद्युत पंप जोडत होते. त्याचवेळी अचानक पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने प्रशांत यांना विजेचा जोरदार धक्का लागून ते जागीच कोसळले.
त्यांच्या पत्नीने ही घटना पाहिल्यानंतर आरडाओरडा करून नातेवाइकांना बोलावले. तत्काळ त्यांना दहिवडी येथील शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच प्रशांत यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. यात्रेदिवशीच झालेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
मृत जवान प्रशांत यांच्यावर रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत कदम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.