हौशींची ‘सोशल’गिरी काळविटांच्या मुळावर!

By admin | Published: March 31, 2017 11:03 PM2017-03-31T23:03:53+5:302017-03-31T23:03:53+5:30

सदाशिवगडावर शिकाऱ्यांचा डोळा : छायाचित्र ‘सोशल मीडिया’वरून ‘व्हायरल’; काळविटांच्या जिवाला धोका

Social 'gigantic' socialism! | हौशींची ‘सोशल’गिरी काळविटांच्या मुळावर!

हौशींची ‘सोशल’गिरी काळविटांच्या मुळावर!

Next



कऱ्हाड : गतकाही दिवसांपासून सदाशिवगडाच्या मागील बाजूस सातत्याने तीन-चार काळविटांचे वास्तव्य आढळून आले आहे. काही अती हौशी लोकांनी काळविटांची छायाचित्रे सोशल मीडियावरून शेअर केल्यामुळे परिसरातील शिकारी आपल्या सावजांचा माग काढू लागले आहेत. या परिसरात वन विभागाचे कर्मचारी क्वचितच येत असल्यामुळे सदाशिवगडावर मुक्तपणे संचार करणाऱ्या काळविटांचा जीव धोक्यात आहे.
सदाशिवगडावरील महादेवाच्या मंदिरामुळे या ठिकाणी तालुक्यातील भाविकांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. याशिवाय कऱ्हाड शहरासह परिसरातून दररोज पहाटे तसेच सायंकाळच्या वेळी शेकडो नागरिक व्यायाम म्हणून सदाशिवगडावर चढाई करीत असतात. स्थानिक ग्रामस्थ तसेच नियमितपणे चढाई करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी लोकसहभागातून सदाशिवगडावर पायऱ्या, वृक्षारोपण, सीसीटीव्ही कॅमेरे, वृक्षारोपण यासह अनेक सुविधा तयार करण्यात आल्या आहे. सदाशिवगडावरील टेंभू प्रकल्पाच्या मागील बाजूचा डोंगर अगदी सांगली जिल्ह्यातील सागरेश्वरपर्यंत विस्तारत गेला आहे. परंतु या ठिकाणी लोकांचे फारसे वास्तव्य नसल्यामुळे वनसंपदेबरोबरच वन्यजीवही आढळून येत असतात.
सदाशिवगडाच्या मागील पठारावरून सागरेश्वर अभयारण्याचे अंतर सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे इतके दूर अंतर कापून सदाशिवगडावर काळविटे किंवा हरणे अपवादानेच येतात; परंतु हे सर्व अंतर झाडाझुडपांचेच असल्यामुळे काळविटांसाठी चाऱ्याच्या शोधासाठी सदाशिवगडापर्यंत पोहोचणे कठीण नाही. त्यामुळेच गेल्या महिन्यापासून सदाशिवगडावर सातत्याने ३ ते ४ काळविटांचा वावर आढळून आला आहे. निसर्गसंपदेने बहरलेल्या सदाशिवगडावर काळविटांचे आगमन ही सुखद बाब असली तरी या ठिकाणी ते अजिबात सुरक्षित नाहीत, हे निश्चित. काही हौशी लोकांनी सदाशिवगडावर दिसलेल्या काळविटांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे चांगल्या सावजांच्या शोधात असणारे शिकारीही सावध झाले आहेत. परिणामी काहीजणांनी काळविटांचा मागही काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काळविटांचे प्राण धोक्यात आले आहेत.
सदाशिवगडावरील मागच्या दुर्गम डोंगरपठारावर शिकाऱ्यांकडून नियमितपणे प्राण्यांच्या शिकारी सुरू असतात. परंतु याठिकाणी वन विभागाचे कर्मचारी अजिबात फिरकत नसल्यामुळे आतापर्यंत एकाही शिकाऱ्यावर कारवाई झाल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे निर्ढावलेल्या शिकाऱ्यांनी आता काळविटांना टार्गेट बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुर्र्मीळ वन्यजीवांना संरक्षण देण्यासाठी वन विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Social 'gigantic' socialism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.