नदीकाठ ओरबाडला तस्करांनी...यातना भोगतायत शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST2021-01-03T04:36:31+5:302021-01-03T04:36:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात नदीपात्र तसेच लगतच्या जमिनीतून वाळू, रेती यांचे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले ...

नदीकाठ ओरबाडला तस्करांनी...यातना भोगतायत शेतकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यात नदीपात्र तसेच लगतच्या जमिनीतून वाळू, रेती यांचे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले आहे. गौण खनिज उत्खननाच्या लिलावात वरचढ बोली घेतली की, आपण नद्या ओरबडायला मोकळे, अशा अविर्भावात लिलाव घेणाऱ्यांनी जेसीबी, पोकलॅन फिरवून वाळू, रेतीचा उपसा केला. आता नदीकाठ ढासळत असल्याने नदीकाठावर पिढ्यानपिढ्या शेती करणारे शेतकरी यातना भोगताना दिसत आहेत.
सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, माणगंगा, येरळा, नीरा या प्रमुख नद्या तसेच त्यांच्या उपनद्या, ओढे मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्यात पूर्वी वाळू लिलाव होत होते
नदीपात्रात मोठी डबकी निर्माण झाल्याने स्थानिक जनतेलादेखील धोका निर्माण झाला आहे. नद्या ओलांडून शेतकरी आपल्या शेतामध्ये कामाला जात होते, मात्र आता नदीमध्ये मोठाले डबरे पडल्याने धोका वाढला आहे. नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बुडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
पॉइंटर
- सातारा जिल्ह्यात वाळू असलेल्या नद्या
कृष्णा, वेण्णा, कोयना, माणगंगा, नीरा, मांड - वसना वांगणा येरळा, तारळी (१२)
-जिल्ह्यात सध्या ६ वाळूच्या ठेक्यांची कार्यवाही सुरू
नदीपात्र पाण्याखाली
सातारा जिल्ह्यामध्ये यंदा मोठा पाऊस झाल्याने प्रत्येक नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू आहे. नदीपात्रातील वाळू लिलावावर बंदी आहे
गेल्या पाच वर्षांत (२०१६ ते २०२०) वाळूचे एकूण ठेके आणि कंसात त्यातून मिळालेला महसूल
२०१६ : १३ ठेके (१६ कोटी ९८ लाख १२ हजार २८ रुपये)
२०१७ : २ (६ कोटी ९२ लाख १ हजार ७ रुपये)
२०१८ : १२ (५ कोटी १५ लाख ६३ हजार ९२३)
२०१९ : ०
२०२० : ६ (कार्यवाही सुरू आहे. पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्यानंतर याचा लिलाव होणार आहे)
वाळूला क्रश सॅन्डचा पर्याय
सातारा जिल्ह्यात वाळूचे लिलाव होत नसल्याने क्रश सॅन्डचा वापर केला जात आहे. जिल्हयात क्रश सॅन्डचे १०० प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतून दिवसाकाठी ७००० ब्रास क्रश सॅन्ड तयार होते. सॅन्ड क्रश ४ हजार रुपये प्रतिब्रास या दराने विकली जात आहे, तर चोरीच्या वाळूचा दर १0 ते १२ हजार रुपये लावला जात आहे.
कोट..१
वाळू व रेती तस्करांनी नदीपात्रालगतच्या जमिनी खरवडून काढल्याने कसायला जमीन राहिलेली नाही. या जमिनीत बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुसऱ्याच्या शेतात मजुरी करावी लागत आहे.
- राजू शेळके, शेतकरी
कोट २
पर्यावरण विभागाच्या मान्यतेशिवाय वाळू लिलाव आता केले जात नाहीत. सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षामध्ये ६ लिलाव करण्यात येणार आहेत, गौणखनिजाची चोरी करणाऱ्यांवर प्रशासनाचे काटेकोर लक्ष असून, धडक कारवायाही सुरू आहेत.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा
कोट ३
नद्यांमधून तसेच पात्रालगतच्या जमिनींचे याआधीच मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले आहे. नद्यांमधील जीव साखळी विस्कळीत झालेली आहे. ही जीव साखळी परस्पर पूरक काम करत असते. बेकायदा उत्खनन थांबले नाही, तर पर्यावरणाचे नुकसान कधीही भरुन येणार नाही. एखादी स्थानिक प्रजाती संपली, तर पुन्हा निर्माण होत नाही.
- डॉ. सुधीर कुंभार, पर्यावरण अभ्यासक
कोट ४
वाळू उपलब्ध होत नसल्याने बांधकामासाठी क्रश सॅन्डचा वापर केला जातो. भविष्यात वाळू ही इतिहासजमा होईल. क्रश सॅन्डच्या माध्यमातून अगदी उत्तम बांधकाम केले जाऊ शकते. क्रश सॅन्ड आणि सिमेंटचा योग्य वापर केला, तर बांधकाम मजबूत होत आहे.
- मजीद कच्छी, कच्छी प्रॉपर्टीज
कोट ५
वाळूचे लिलाव होत नसल्याने क्रश सॅन्ड वापरली जात आहे. क्रश सॅन्डमध्ये ओलावा कमी असतो. त्यामुळे बांधकाम करताना सिमेंटचा वापर जास्त करावा लागतो. योग्य प्रमाणात क्रश सॅन्ड आणि सिमेंट यांचे मिश्रण केले, तर बांधकाम मजबूत होते.
- प्रशांत सावंत, इनोव्हेटिव्ह कंस्ट्रक्शन, सातारा
फोटो ओळ : सातारा तालुक्यातील अंगापूर येथे बेसुमार वाळू उपशामुळे कृष्णा नदीत ठिकठिकाणी डबकी निर्माण झाली आहेत. (छाया : संदीप कणसे)
फोटो नेम : ०२रिव्हर