जिल्ह्यात एका डॉक्टर महिलेसह सहाजणांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:17+5:302021-06-22T04:26:17+5:30
सातारा : जिल्ह्यात लाकडाऊन शिथिल होताच आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यात रविवारी विविध ठिकाणी पाचजणांनी आत्महत्या केल्याची घटना ...

जिल्ह्यात एका डॉक्टर महिलेसह सहाजणांची आत्महत्या
सातारा : जिल्ह्यात लाकडाऊन शिथिल होताच आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यात रविवारी विविध ठिकाणी पाचजणांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारीही जिल्ह्यात आणखी सहाजणांनी आपले जीवन संपवले. कोणाचे कौटुंबिक, तर कोणाचे आर्थिक कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांत तब्बल ११ जणांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शाहूपुरीतील तामजाईनगर, सहयोग काॅलनीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या डॉ. कविता विश्वासराव भंडारे (वय ५९) यांनी दि. २० रोजी सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप पुढे आले नाही. याबाबत अरुण ठोके (रिमांड होमसमोर, सदर बझार सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. दुसरी घटना कऱ्हाड शहरात घडली. अक्षय धनंजय भोसले (वय २४, रा. मुक्ताई अपार्टमेंट शुक्रवार पेठ, कऱ्हाड) याने दि. २० रोजी इमारतीच्या टेरेसवरील बीमला गळफास घेऊन आत्महत्या केली. याची खबर गणेश भोसले (रा. शुक्रवार पेठ, कऱ्हाड) यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्याच्याही आत्महत्येचे कारण पोलिसांना समजू शकले नाही. तिसरी घटना वाई तालुक्यातील भुईज कदमवाडी येथे घडली. अभिजित भिकू कदम (वय २७, रा. कदमवाडी, ओझर्डे, ता. वाई) याने दि. १९ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची चौथी घटना सातारा तालुक्यातील शेळकेवाडी येथे घडली. बाळू पांडू पवार (वय ५५, मूळ रा. विजापूर, कर्नाटक, सध्या रा. शेंद्रे, ता. सातारा) यांनी दि. २० रोजी सकाळी नऊच्या सुमारास शेळकेवाडी येथील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याची खबर अशोक राठोड (वय ३५, रा. विजापूर, कर्नाटक) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पाचवी घटना कऱ्हाड शहरामध्ये घडली. शुभम पद्माकर आडके (वय २४, रा. साई श्रद्धा अपार्टमेंट मुंडे. ता. कऱ्हाड) याने दि. २० रोजी राहत्या घरात बेडरूममध्ये फ्रीजवर चढून फॅनच्या हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहावी घटना फलटण येथे घडली आहे. जयसिंग गुलाबराव जगताप (वय ७०, रा. चिंचवण, माळेगाव, काॅलनी माळेगाव बुद्रुक, पुणे) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याबाबत हणमंत धुळाजी सोनवलकर (वय ५०, पोलीस पाटील दुधेबावी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. एकापाठोपाठ एक अशा आत्महत्या होऊ लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.