Local Body Election: उमेदवारांचे लोटांगण; कार्यकर्त्यांचे तुफान आलंया, प्रचारासाठी उरले सहा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:48 IST2025-11-25T19:47:26+5:302025-11-25T19:48:46+5:30
उमेदवारांकडून पदयादात्रा काढत ‘हाेम टू हाेम’ प्रचार

संग्रहित छाया
वैभव पतंगे
सातारा : पालिका निवडणुकांचा फिव्हर चांगलाच वाढला आहे. आता प्रचारासाठी केवळ सहा दिवस राहिले असल्याने उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. काॅर्नरसभा, पदयादात्रा काढत ‘हाेम टू हाेम’ प्रचार करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. प्रचारादरम्यान उमेदवाराकडून पाठीशी राहा, असे आवाहन केले जात आहे.
नाेकरी-व्यवसायानिमित्त परगावी असणाऱ्या मतदारांशी संपर्क केला जात आहे. ‘भाऊ तेवढं लक्ष असू द्या, यंदा आपली उमेदवारी आहे,’ असे म्हणत मतदारांना साद घातली जात आहे. अनेकजण तर मतदाराच्या पाया पडून आशीर्वाद देण्याची मागणी केली जात आहे, तर कार्यकर्त्यांकडूनही तुफान आलंया म्हणत आमच्या भाऊलाच पाठीशी राहण्याचे आवाहन केले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील नऊ पालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकांमुळे आराेप-प्रत्याराेपाने राजकीय वातारण ढवळून निघाले आहे. यंदा बऱ्याच कालावधीनंतर निवडणुका हाेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडणुकीच्या रिंगणात अपक्षांनी उडी घेत खरी रंगत आणली आहे. मात्र त्यांना अद्याप निवडणूक चिन्हच नसल्याने प्रचारात गाेची हाेत आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर व पाचगणी वगळता भाजप व इतर पक्षांतच सामना रंगला आहेत तर काही ठिकणी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिंदेसेनेच कुस्ती हाेत आहे.
प्रचारासाठी उरले सहा दिवस
यंदा प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला आहे. दि. २ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ सहा दिवसच शिल्लक राहिले आहेत. सहा दिवसांत संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहेे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पाेहोचण्यासाठी धावाधाव करत आहेत. काहींनी मतदारांशी थेट संपर्क ठेवण्यासाठी माणसंही नेमली गेली आहेत. वरिष्ठ नेत्यांची प्रभागात सभा आयाेजित करता येतील, यांचे नियाेजन केले जात आहे. कार्यकर्त्यांकडून मतदार याद्या चाळण्याचे काम जाेरात सुरू आहे.
पंगती, तर कुठे लक्ष्मीदर्शन !
यंदा नगरसेवक हाेण्याचा चंग बांधलेल्या उत्साही कार्यकर्त्यांकडून जेवणावळीच्या पंगती उठविल्या जात आहे. तर काही ठिकाणी लक्ष्मी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असली तरी अद्याप लक्ष्मीदर्शन सुरू केले नाही. प्रचाराच्या शेवटच्या क्षणी याचा वापर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.