दुकानासमोर फुटपाथ बनला विंडो डिस्प्ले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST2021-01-03T04:36:29+5:302021-01-03T04:36:29+5:30
सातारा : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानातील माल फुटपाथवर ठेवून अनोख्या पद्धतीने अतिक्रमण करण्याची सवय काही व्यापाऱ्यांना लागली आहे. फुटपाथचा ...

दुकानासमोर फुटपाथ बनला विंडो डिस्प्ले!
सातारा : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानातील माल फुटपाथवर ठेवून अनोख्या पद्धतीने अतिक्रमण करण्याची सवय काही व्यापाऱ्यांना लागली आहे. फुटपाथचा विंडो डिस्प्ले करून अतिक्रमण करणाऱ्या या बहाद्दरांकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने बघावे, अशी मागणी होत आहे.
अतिक्रमण काढताना जो माझे नाव घेईल, त्याचे अतिक्रमण आधी काढा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेला दिल्या. पालिकेची अतिक्रमण मोहीम पुढे गेल्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. मोकळ्या जागेवर अतिक्रमणे काढण्यात व्यस्त असलेल्या नगरपालिकेपुढे आता दुकानांच्या समोर मांडलेल्या वस्तू काढण्याचीही वेळ येऊ लागली आहे. लोखंंडी अँगलच्या सहाय्याने टेबल तयार करून त्यावर साहित्य ठेवल्याचे चित्र मुख्य रस्त्यावरही पहायला मिळत आहे.
साताऱ्यात तळात गाळे असणाऱ्या दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी माल वर ठेवावा लागतो, अशी त्यांची बाजू मांडली. शहर व परिसरात शेकडो दुकाने बेसमेंटमध्ये थाटली आहेत. वर्षानुवर्षे तिथे ग्राहकांचा राबताही आहे. पण सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करण्याची वृत्ती न सोडता अन्य कारणे सांगून अतिक्रमणांचे समर्थन केले जात आहे.
चौकट :
असे केले जातेय अतिक्रमण!
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि दुकानात काय वस्तू आहेत, याची माहिती होण्यासाठी व्यापारी काचेत वस्तू मांडतात. याला ‘विंडो डिस्प्ले’ असेही म्हणतात. दुकानात न येताही ग्राहक डिस्प्ले बघून आत जायचे की नाही, हे ठरवित असतो. मात्र, ज्यांची दुकाने लहान आहेत, त्यांना हा डिस्प्ले करता येत नाही. अशा व्यापाऱ्यांनी चक्क फुटपाथलाच त्यांचे डिस्प्ले विंडो केले आहे. यामुळे पदपथाचा उपयोग पादचाऱ्यांना होतच नाही. परिणामी हे अतिक्रमण फुटपाथवर येवू लागले आहे.
कोट :
व्यावसायिकांनी व्यवसायाच्या स्वरूपानुसारच दुकान गाळा घेतलेला असतो. गाळा घेताना व्यवसायाच्या विचाराने योग्य वाटला तरच तिथे दुकान थाटले जाते. मग ग्राहक येत नाही म्हणून वस्तू दुकानाबाहेर मांडतो असे दुकानदारांचे समर्थन होऊ शकत नाही. यासाठी कोणाच्या कारवाईची प्रतीक्षा न करता नैतिकता जोपासणे अधिक महत्त्वाचे आहे.
- आप्पा कोरे, तेली खड्डा, सातारा
फोटो ०२सातारा-अतिक्रमण
साताऱ्यातील प्रमुख रस्त्यावरील मोठ्या दुकानदारांनीही अनेक वस्तू मांडून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठीही जागा राहत नाही.