Satara ZP: ठासून कुठलं, सगळं घासूनच आलंय; शिंदेसेनेचा उमेदवार तर केवळ एका मतानं विजयी
By प्रमोद सुकरे | Updated: February 13, 2026 18:46 IST2026-02-13T18:45:30+5:302026-02-13T18:46:28+5:30
कराड तालुक्यातील निकालांनी उमेदवारांसह नेत्यांना फोडलाय घाम

संग्रहित छाया
प्रमोद सुकरे
कराड : मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. नेत्यांच्या, उमेदवारांच्या विजयाच्या घोषणाही दिल्या. पण, कराडला या सगळ्या घोषणात ‘घासून नाय ठासून आलोय’ ही घोषणा कुठंच ऐकायला मिळाली नाही. कारण बहुतांश लढती अटीतटीच्या झाल्या आहेत. ‘ठासून कुठलं सगळं घासूनच आलंय’ अशी परिस्थिती आहे. एक उमेदवार तर अवघ्या १ मताने विजयी झाला आहे. त्यामुळे उमेदवारांसह नेत्यांना घाम फुटलाय बरं.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कराड तालुक्यात यंदा पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकदम अटीतटीच्या झालेल्या पाहायला मिळाल्या. प्रमुख लढत भाजप, राष्ट्रवादीतच झाली असली तरी शिंदेसेना व काँग्रेसनेही काहीसे यश मिळवले आहे. कुठे दुरंगी, तर कोठे तिरंगी, चौरंगीही लढती पाहायला मिळाल्या. परिणामी विजयाप्रत पोहोचताना उमेदवारांची दमछाक झाली. मतमोजणीच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक सुरू होती.
वाचा: ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपच्या नेत्यांनी शंभूराजेंवर टीकेची झोड उठवली, निकालानंतर 'त्यांचाच' आधार घेण्याची वेळ आली
कराड तालुका हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. येथे जिल्हा परिषदेचे १२ गट, तर पंचायत समितीचे २४ गण आहेत. हे गट व गण कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघात विखुरलेले आहेत. त्यामुळे या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील राजकीय नेत्यांचा या निवडणुकांवर परिणाम झाल्याचे दिसले.
रेठरेवगळता कोठेच कोणाला ‘रेटता’ आलेले नाही
तालुक्यातील फक्त रेठरे जिल्हा परिषद मतदारसंघातच भाजपच्या उमेदवारांना साजेसं मताधिक्य मिळाले आहे. ते वगळता इतर एकाही मतदारसंघात कोणालाच समाधानकारक मते मिळालेली नाहीत. काहींचे बुरुज ढासळले आहेत. त्यामुळे रेठरेवगळता इतर कोठेही कोणाला रेटता आलेले नाही, अशी चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वाचा: सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच, मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पंचायत समितीतील बलाबल
- भाजप - १३
- राष्ट्रवादी (अजित पवार) - ४
- राष्ट्रवादी (शरद पवार) - ३
- काँग्रेस - २
- शिंदेसेना - २
पंचायत समिती गणात काठावर पास
- तांबवे - दिनेश कुंभार - शिंदेसेना - १ मत
- उंब्रज - संगीता चव्हाण - राष्ट्रवादी (शरद पवार) - ३९ मते
- पाल - प्रताप चव्हाण - राष्ट्रवादी (शरद पवार) - ९३ मते
- येळगाव - वृषाली पाटील - राष्ट्रवादी (अजित पवार) - ९९ मते
- वाघेरी - अनिता वेताळ - भाजप - १०५ मते
जिल्हा परिषद गटातही टक्कर
- वारुंजी - सुनंदा पाटील - काँग्रेस - २४३
- सुपने-ताबवे - धनंजय ताटे - भाजप - ३८०
- कार्वे - विजया थोरात - राष्ट्रवादी (अजित पवार) - ४५३