चारा तिथेच निवारा घेत मेंढपाळ काळ्या रानाकडे रवाना, मजल-दरमजल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:00 IST2020-12-08T14:57:58+5:302020-12-08T15:00:25+5:30
wildlife, Mandesh, Sataranews माणदेशातील माळरानावरील हिरवीगार गवताचा चारा वाळून पिवळा पडल्याने, मेंढ्या जगविण्यासाठी माणदेशी मेंडपाळांनी परमुलखाची वाट धरली आहे.चारा सापडेल तेथे निवारा घेत मजल-दरमजल करत मेंढपाळ काळ्या रानाकडे निघाले आहेत.

चारा तिथेच निवारा घेत मेंढपाळ काळ्या रानाकडे रवाना, मजल-दरमजल सुरू
सिद्धार्थ सरतापे
वरकुटे-मलवडी : माणदेशातील माळरानावरील हिरवीगार गवताचा चारा वाळून पिवळा पडल्याने, मेंढ्या जगविण्यासाठी माणदेशी मेंडपाळांनी परमुलखाची वाट धरली आहे.चारा सापडेल तेथे निवारा घेत मजल-दरमजल करत मेंढपाळ काळ्या रानाकडे निघाले आहेत.
दिवाळीच्या सणाला मोठ्या कौतुकाने हौसमौज करुन रंगवलेली मेंढरं सोबत घेऊन, मोजकेच सामान घोड्यावर लादून, कारभारणीच्या हाती घोड्याची लगाम देत मंढपाळांनी काळ्यारानाच्या दिशेने आगेकूच करीत चारणीचा मार्ग धरला आहे. सोबत संसारोपयोगी साहित्य, लहान मुले, कोकरी, कोंबडी, कुत्री आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन,अर्धांंगिनीच्या डोक्यावर पाटी देत मजल दरमजल करीत काळ्यारानाच्या दिशेने वाटचाल आहेत. मेंढ्या चारत चारत दिवस मावळल तिथेच मुक्काम करत माणदेशातील मेंढपाळ परमुलकात रवाना होणे हा त्यांचा सध्या दिनक्रम आहे.
ग्रामीण भागात हमखास अर्थप्राप्ती करून देणारा व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जाते. वळई, विरळी, जांभुळणी, पुकळेवाडी, शेणवडी, खरातवाडी, गटेवाडी, वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी या भागातील मेंढपाळ दिवाळीला मेंढ्यांची गावातून मिरवणूक काढून ग्रामदैवतांंचा आशीर्वाद घेतात. दूध ज्या बाजूला उतू जाईल, त्या दिशेने मेंढरं घेऊन जाण्याची परंपरा आहे.
लातूर, बार्शी, सोलापूर, माढा, कोल्हापूर, सातारा या भागातील नद्यांच्या खोऱ्यात मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जातात. सात महिने ऊन, वाऱ्यासह येईल त्या संकटाचा सामना करत मेंढ्यांची काळजी घेतात. घरातील वयस्कर, लहान मुले गावी राहतात. ज्यांच्या घरी कोणी नाही, अशी मंडळी लहान मुलांना घोड्यांच्या पाठीवर बांधून चारणीस जातात. यामुळे अनेक लहान मुलांना शिकण्याची इच्छा असूनही त्यांना परिस्थितीमुळे शिकायला मिळत नाही ही शोकांतिका बनून राहिली आहे.