Satara Politics: माढा लोकसभेसाठी साताऱ्यातील पावणे सात लाख मतदार

By नितीन काळेल | Published: January 24, 2024 05:52 PM2024-01-24T17:52:35+5:302024-01-24T17:55:29+5:30

सातारा : लोकसभा निवडणुकीला थाेडाच अवधी राहिला असून जिल्हाधिकारी कार्यालय पातळीवर निवडणुकीची तयारी होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघाची अंतिम ...

Seven lakh voters in Satara for Madha Lok Sabha | Satara Politics: माढा लोकसभेसाठी साताऱ्यातील पावणे सात लाख मतदार

Satara Politics: माढा लोकसभेसाठी साताऱ्यातील पावणे सात लाख मतदार

सातारा : लोकसभा निवडणुकीला थाेडाच अवधी राहिला असून जिल्हाधिकारी कार्यालय पातळीवर निवडणुकीची तयारी होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघाची अंतिम मतदारयादी जाहीर झाली असून माढा लोकसभेसाठी १९ लाख ६६ हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ६ लाख ७८ हजार मतदारांचा समावेश आहे.

लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ ला माढा अस्तित्वात आला. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिररस या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघही माढा लोकसभेला जोडलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याचे अधिक मतदार असतात. लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. तसेच राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदारांची अंतिम मतदार यादीही जाहीर केली आहे. 

त्यानुसार कोणत्या विधानसभा मतदारसंघात अधिक मतदार असणार हेही समोर आलेले आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यानेही मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. सातारा जिल्ह्यात एकूण २५ लाख ४६ हजार मतदार आहेत. यामध्ये माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचाही समावेश आहे. पण, माण आणि फलटणमधील मतदार हे लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत.

एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार यावरही विधानसभा मतदारसंघातून कसा मतदाराचा प्रतिसाद राहील हेही समोर येणार आहे. तसेच उमेदवारांना निवडणुकीला सामोरे जाताना राजकीय आखाडेही बांधता येणार आहेत. तरीही माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील मतदारांचा वरचष्मा अधिक राहणार, हे निश्चित आहे. त्याचबरोबर माढा लोकसभेसाठी विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास माणमध्ये सर्वाधिक मतदारांची नोंद झालेली आहे.

माढा लोकसभेसाठी मतदार असे..

विधानसभा मतदारसंघ मतदार
माढा ३,३२,९७१
करमाळा ३,१४,७१८
सांगोला ३,०६,६६५
माळशिरस ३,३३,६१८
माण ३,४५,१४३
फलटण ३,३२,८८६

तीनवेळा तीन जिल्ह्यातील खासदार..

माढा लोकसभा मतदारसंघ सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात विस्तारला आहे. या मतदारसंघाचे पहिल्यांदा २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेतृत्व केले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता. पवार हे पुणे जिल्ह्यातील उमेदवार होते. २०१४ च्या दुसऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचेच व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी युतीचे सदाभाऊ खोत यांच्यावर विजय मिळविलेला. मोहिते-पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. तर २०१९ च्या तिसऱ्या निवडणुकीत भाजपने प्रथमच कमळ फुलविले. सातारा जिल्ह्यातील फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना पराभूत केले होते. तीन निवडणुकीत तीन जिल्ह्यातील उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

Web Title: Seven lakh voters in Satara for Madha Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.