Satara Politics: एका कारखानदारांचा 'पक्षप्रवेश' तर दुसऱ्याचा 'सत्कार'!; 'पुतण्या' पाठोपाठ 'काका'ही करणार कराड दौरा
By प्रमोद सुकरे | Updated: April 17, 2025 11:56 IST2025-04-17T11:53:48+5:302025-04-17T11:56:45+5:30
प्रमोद सुकरे कऱ्हाड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी(दि.१९ ) कराड दौऱ्यावर येत आहेत. रयत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष ...

Satara Politics: एका कारखानदारांचा 'पक्षप्रवेश' तर दुसऱ्याचा 'सत्कार'!; 'पुतण्या' पाठोपाठ 'काका'ही करणार कराड दौरा
प्रमोद सुकरे
कऱ्हाड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी(दि.१९ ) कराड दौऱ्यावर येत आहेत. रयत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अॅड.उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश होणार आहे. तर त्या पाठोपाठ सोमवारी (दि.२१) ज्येष्ठ नेते शरद पवार कराडला दौऱ्यावर आहेत. ते सह्याद्री साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटलांसह नूतन संचालक मंडळांचा सत्कार करणार आहेत. हे दोन वेगवेगळे कार्यक्रम असले तरी दोन वेगवेगळ्या राष्ट्रवादीचे कार्यक्रम आहेत. अन 'पुतण्या' पाठोपाठ 'काकां'चा होणारा कराड दौरा राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा ठरणार आहे.
खरंतर बारामतीचे पवार अन् कराड यांचे नाते वेगळे आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून 'थोरल्या' पवारांची ओळख आहे. तर या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी 'धाकले' पवारही येतात. हे दोघेही यशवंत विचारांची जोपासना करीत समाजकारण, राजकारण करण्याचे काम करीत आहेत.
अलीकडच्या काळात मात्र काका- पुतण्यात अंतर पडले आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली याच कराडकरांनी 'आम्ही साहेबांसोबत' म्हणत पहिल्यांदा शरद पवारांची पाठराखण केली होती. तोच प्रभाव पुन्हा महाराष्ट्रभर राहिला आणि लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रत्यंतरही दिसून आले.
मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. राज्याच्या तिजोरीच्या चाव्याही त्यांच्याकडे आहेत. हे सगळे खरे असले तरी एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्यात आता राष्ट्रवादीची ती परिस्थिती राहिली नाही याची सल अजित पवारांच्या मनात कायम आहे. म्हणून तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातीलच एक 'चाल' म्हणून उदयसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश मानला जातोय. आता या कार्यक्रमाला येऊन पवार नेमके काय बोलणार? याची उत्सुकता तर राहणारच.
दुसरीकडे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच तिरंगी झाली. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शिरेदार बाळासाहेब पाटील यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली. खरंतर त्याचे पेढे परवा थोरल्या पवारांनी सातारला आल्यावर खाल्ले होते. पण आता याच शिलेदाराचे कौतुक करण्यासाठी, आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सोमवार दि. २१ रोजी थोरले पवार कराडला येत आहेत. आता ते देखील कार्यकर्त्याना नेमका काय संदेश देतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मुलाचा साखरपुडा झाला. त्याला थोरल्या पवारांसह सगळा पवार परिवार एकत्र होता. त्यानंतर सातारच्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला काका- पुतणे खुर्चीला खुर्ची लावून बसलेले होते. त्या दोघांनी कान गोष्टी करताना अनेकांनी पाहिले आहे. पण पैकी एक कार्यक्रम पारिवारिक तर दुसरा शिक्षण संस्थेचा होता असेच सांगणे अजित पवारांनी पसंत केले आहे. आता मात्र हे दोघेही त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यामुळे याकडे अनेकांचे लक्ष आहे.
सह्याद्रीच्या निकालानंतरचा दौरा महत्त्वाचा सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार कराडला आले होते. तेव्हा प्रीतिसंगमावर बाळासाहेब पाटलांनी त्यांचे स्वागत केले होते.तेव्हा कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात त्यांनी त्यांच्याकडे आवर्जून चौकशी केली होती. आता निवडणूक झाली आहे. बाळासाहेबांनी बाजी मारली आहे. त्यामुळे अजितदादांच्या दौऱ्यात नेमके काय काय घडणार?हे पहावे लागणार आहे.
राजकारण साखर कारखानदारी भोवतीच फिरतय
पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण साखर कारखानदारी भोवती नेहमीच फिरत राहिले आहे.त्यामुळे कारखानदारांच्या भूमिकेला नेहमीच महत्व असते.हेच ओळखून धाकट्या पवारांनी एका कारखानदारांना गळाला लावले आहे.तर त्यांच्या विरोधातील दुसऱ्या कारखानदाराला बळ देण्यासाठी थोरले पवार येत आहेत.मग यांची चर्चा तर होणारच!