Secondary mineral excavation; Dumper abduction, incident at Kadapur | कठापूर येथे गौण खनिज उत्खनन; डंपरची पळवापळवी
कठापूर येथे गौण खनिज उत्खनन; डंपरची पळवापळवी

ठळक मुद्देगौण खनिज उत्खनन; डंपरची पळवापळवी, कठापूर येथील घटनाशासकीय कामात अडथळा; युवकावर गुन्हा

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील कठापूर येथे अवैध मुरूम उत्खनन सुरू होते. कारवाईसाठी तलाठी गेल्यानंतर जेसीबी व डंपर पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला आहे.

संतोष निवृत्ती केंजळे (रा. कठापूर, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत तलाठी अंकुश लक्ष्मण घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तलाठी अंकुश घोरपडे व कोतवाल बक्शुद्दीन भालदार हे गावातील रामोशी वस्तीवरून जात असताना गट नंबर ७०१ मध्ये मुरूम उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले.

विना नंबरप्लेटच्या जेसीबीने मुरूम उत्खनन सुरू होते. मुरूम वाहतुकीसाठी शेजारी डंपर (एमएच ११ एएल ७८२१) हा उभा केला होता. त्या ठिकाणी उभा असलेल्या संतोष केंजळे याला मुरूम उत्खननाच्या शासकीय परवान्याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे त्याने सांगितले. तलाठ्यांनी या उत्खननाचा पंचनामा करून ही वाहने तहसील कार्यालय कोरेगाव येथे घेऊन येण्याबाबत सूचना केली. मात्र, संतोष केंजळे याने वाहनचालकांना वाहने कोरेगावला नेऊ नका.

जेसीबी व ट्रॅक्टर आपल्या वस्तीवर घेऊन चला, असे सांगितले. तसेच तलाठी यांच्याकडे पाहून तुम्हाला काय करायचेय ते करा मी बघून घेतो. अशा भाषेत दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तलाठी अंकुश घोरपडे यांनी याबाबतची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली.संशयित आरोपीला पकडण्यासाठी रहिमतपूर पोलिसांची टीम पाच दिवसांत दोनवेळा कठापूर येथे गेली होती. मात्र, संशयित आरोपी सापडला नसल्याने फरार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास घनशाम बल्लाळ करत आहेत.

महसूल कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची

कोरेगाव तालुक्यातील कठापूर येथे बेकायदा उत्खनन करणाºयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे तलाठ्यांनी धाडस दाखवले. शासनाचा महसूल बुडू नये, म्हणून त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले. परंतु जिल्हाभरातील यापूर्वीच्या काही घटना पाहिल्या असता अनेकदा बेकायदा कामे करणाऱ्यांबरोबर महसूल कर्मचाऱ्यांच्यात वादावादी होऊन हाणामाऱ्या झाल्या आहेत. महसूल प्रशासनातील तलाठी हा तळातील महत्त्वपूर्ण कर्मचारी असून, त्यालाही कुटुंब आहे. त्यामुळे जीव पणाला लावून इमान राखणाऱ्या तलाठ्यांच्या सुरक्षेकडे अवैध व्यावसायिकांच्या विरोधातील कारवाईदरम्यान वरिष्ठांनी दुर्लक्ष करू नये. सुरक्षा व्यवस्थेची तजवीज करूनच छापेमारी करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Secondary mineral excavation; Dumper abduction, incident at Kadapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.