दुसरी पास आजींच्या जिभेवर ‘ज्ञानोबांची शाळा’

By Admin | Updated: January 20, 2015 00:03 IST2015-01-19T21:49:35+5:302015-01-20T00:03:03+5:30

कुडाळमध्ये पारायण : ८३ वर्षांच्या सुलोचना जंगम सांगतात सार्थ ज्ञानेश्वरी

The second pass, on the tongue of 'Gyanob school' | दुसरी पास आजींच्या जिभेवर ‘ज्ञानोबांची शाळा’

दुसरी पास आजींच्या जिभेवर ‘ज्ञानोबांची शाळा’

दत्तात्रय पवार - कुडाळजावळी तालुक्यातील गावागावांत आजही पारायण सोहळ्यातून संत वाङ्मयाचा प्रचार केला जातो. हरिपाठ, प्रवचन, कीर्तनातून संत वाङ्मय नव्या पिढीमध्ये रुजवण्याचे काम पारायण सोहळ्यातून होताना पाहायला मिळते. कुडाळ येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यात दुसरी पास असणाऱ्या ८३ वर्षीय सुलोचना (माई) दत्तात्रय जंगम या ज्ञानेश्वरी वाचनाची अखंड परंपरा जपत संतांचे विचार नव्या पिढीत रुजवत आहेत.२००२ पासून कुडाळ या बाजारपेठेच्या गावात ग्रामस्थ मंडळ, पारायण मंडळ पिंंपळेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा सुरू करण्यात आला. आज या सोहळ्याला १३ वर्षे पूर्ण होत आहेत. सात दिवसांपासून सुरू असलेल्या या पारायण सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम होत असतात. १३ वर्षांपासून सुलोचना जंगम या पारायण सोहळ्यात सहभाग नोंदवत आल्या आहेत. अगदी पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्री कीर्तन संपेपर्यंत त्या पारायण सोहळ्याचा मंडप सोडत नाहीत.जुन्या काळातील दुसरीपर्यंत शिक्षण झालेल्या सुलोचना जंगम या फाडफाड ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करतात व सुलभ अनुवाद सांगतात. तेव्हा उपस्थितही लक्षपूर्वक ऐकून नवल करतात. ८३ वर्षे वय होऊनही त्या सकाळी हरिपाठात तल्लीन होऊन हरिपाठ म्हणतात. त्यांच्याकडून सांप्रदायिक परंपरा जपण्याचे जे काम होत आहे याचे तालुक्यातील कौतुक होत आहे.

संतांच्या विचारातून जीवनाला एक नवी दिशा मिळते. तर संत विचार हे मनुष्याला जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे नव्या पिढीतही हे विचार रुजले जावेत, यासाठी या वयातही ज्ञानेश्वरी वाचन करते.
- सुलोचना जंगम, कुडाळ


ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याची सांगता मंगळवार, दि. २० रोजी होत आहे. यानिमित्त ९ ते ११ या वेळेत यशवंत पाटील (ठाणे) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: The second pass, on the tongue of 'Gyanob school'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.