सुनावणीवेळी तहसीलदारांसमोर आरडाओरड केली, न्यायालयाने एकाला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली
By दत्ता यादव | Updated: August 26, 2022 14:37 IST2022-08-26T14:37:19+5:302022-08-26T14:37:46+5:30
आरोपी बाळासो बर्गे याने मोठमोठ्याने आरडाओरड करून मग्रुरीने बोलून टेबलावरील कागदपत्रे हिसकावून घेतली

सुनावणीवेळी तहसीलदारांसमोर आरडाओरड केली, न्यायालयाने एकाला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली
सातारा: कोरेगावच्या तहसीलदारांकडे सुनावणी सुरू असताना आरडाओरड करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तदर्थ १ जिल्हा न्यायाधीश पी.पी. अभंग यांनी चंद्रशेखर बाळासाहेब ऊर्फ बाळासाे बर्गे (वय ३४, रा. कालेकर काॅलनी, कोरेगाव) याला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, कोरेगावच्या तहसीलदारांकडे एका केसची सुनावणी सुरू होती. त्यावेळी दंडाधिकाऱ्यांनी तुमचे म्हणणे सादर करा, असे सांगितले. त्यावेळी आरोपी बाळासो बर्गे याने मोठमोठ्याने आरडाओरड करून मग्रुरीने बोलून टेबलावरील कागदपत्रे हिसकावून घेतली. ही कागदपत्रे परत घेण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून त्याने शासकीय कामात अडथळा आणला.
याप्रकरणी त्याच्यावर कारेगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हवालदार ए.ए. भोसले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी बाळासो बर्गे याला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.