शिक्षकाच्या अश्लील हावभावप्रकरणी कवठे शाळेला टाळे : ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:06 IST2019-04-09T13:06:06+5:302019-04-09T13:06:54+5:30
खंडाळा तालुक्यातील कवठे येथील एक उपशिक्षक विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर अश्लील हावभाव करतो, विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करतो, व्यवस्थित न शिकवता गैरहजर राहणे

शिक्षकाच्या अश्लील हावभावप्रकरणी कवठे शाळेला टाळे : ग्रामस्थ आक्रमक
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील कवठे येथील एक उपशिक्षक विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर अश्लील हावभाव करतो, विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करतो, व्यवस्थित न शिकवता गैरहजर राहणे असा आरोप करत संतप्त झालेल्या कवठे ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास शाळेला टाळे ठोकले.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कवठे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीपर्यंत ११२ विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानग्रहण करतात. या ठिकाणी सहा शिक्षक कार्यरत आहेत. उपशिक्षक बाळासाहेब संकपाळ याची सहा महिन्यांपूर्वी आॅनलाईन पद्धतीने नियुक्ती झाली.
नियुक्ती झाल्यानंतर संबंधित उपशिक्षक विद्यार्थ्यांबरोबर अश्लिल हावभाव करतात, सातत्याने मारहाण करतात, शिकवणे सोडून मोबाईलमध्ये व्यस्त राहतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून पालकांकडे झाली. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती व सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत खंडाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती.
यावेळी संबंधितांनी केवळ चौकशी करुन संबंधीत शिक्षकावर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत तीन महिन्यांपूर्वी संबंधित शिक्षकाला शाळेत येण्यास बंदी घातली. दरम्यान, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन ग्रामस्थांनी स्वखर्चाने एका खासगी शिक्षकाची नियुक्ती केली. त्यांच्याकडून संकपाळ शिकवत असलेल्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन घेतला. यानंतरही संबंधित शिक्षकावर कारवाई होत नसल्याचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अलका मुळीक, विस्ताराधिकारी गजानन आडे हे केवळ शिक्षकाची चौकशी न करता ग्रामस्थांना आरोप उभे करत होते, अशी तक्रार गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्याकडे केली. यावेळी गटविकास अधिकारी बापट व प्रभारी गटशिक्षणाधिकारी गजानन आडे व केंद्र प्रमुख मुजावर यांनी ग्रामस्थांची समजूत काढली.
संकपाळ यांना कवठे येथे रुजू होऊ देणार नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करुन भविष्यात नवीन शिक्षकाचे नेमणूक करू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी टाळे काढले.