महामार्गाच्या बाजुच्या माॅलमध्ये बचत गटांना जागा देणार; ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:35 IST2025-01-17T18:34:56+5:302025-01-17T18:35:18+5:30
साताऱ्यातही भव्य माॅल उभारणार; मानीनी जत्रा उद्घटन

महामार्गाच्या बाजुच्या माॅलमध्ये बचत गटांना जागा देणार; ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा
नितीन काळेल
सातारा : ‘उमेद’च्या माध्यमातून बचत गटातील महिला सक्षम होत आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या राहणाऱ्या या महिलांना शासनही ताकद देणार आहे. यासाठी महामार्गाच्या बाजुच्या मोठ्या माॅलमध्ये बचत गटांचे स्टाॅल राहतील, त्यांना जागा मिळेल अशी भूमिका घेण्यात येईल. त्याचबरोबर साताऱ्यातही भव्य माॅल उभा करु, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित मिनी सरस मानीनी जत्रा आणि महाआवास अभियानाचा शुभारंभ मंत्री गोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, देश विकसीत होण्यासाठी महिला सक्षम होण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हीच संकल्पना पुढे आणली आहे. त्यामुळे लखपती दिदी योजना सुरू झाली. आतापर्यंतच्या इतिहासात सातारा जिल्हा कोठेही मागे राहलेला नाही. बचत गटांच्या चळवळीतही पुढेच आहे. उमेद अंतर्गत बचत गटातील महिला फक्त खाद्यपदाऱ्थ तयार करत नाहीत, तर त्यापुढेही त्या गेलेल्या आहेत. विविध वस्तूंचे उत्पादन होत आहे. सातारा जिल्ह्यातील पाचगणीत१४ कोटी रुपयांचा भव्य माॅल उभा राहत आहे. यामुळे ५०० बचत गटांची व्यवस्था होणार आहे.
नरेंद्र पाटील म्हणाले, उमेद अभियानाने महिलांना सक्षमपणे उभे केले आहे. बचत गटातील या महिलांसाठी महामार्गाच्या बाजुला माॅल तयार करावेत. याठिकाणी महिला बचत गटांनीही स्वत:चे मार्केट तयार करावे. तसेच बचत गटांनी आपल्या साहित्याची अधिक विक्री होण्यासाठी संपर्क क्रमांक द्यावा.
झेडपीच्या मोक्याच्या जागांकडे अनेकांचे लक्ष
कार्यक्रमात मंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अनेक जागा आहेत. याची माहिती घेत असून तेथे काय करता येते का ते पाहिले जाईल असे स्पष्ट केले. तसेच जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या जागा आहेत. त्याच्याकडे अनेकांचे लक्ष आहे, असेही निक्षून सांगितले. त्यामुळे गोरे यांचा रोख नेमका कोणाकडे ? याविषयी जोरदार चर्चा सुरू होती.