सतरा वर्षांत शंभरवर बेवारस रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST2021-01-03T04:36:40+5:302021-01-03T04:36:40+5:30
सध्याच्या धावपळीच्या जगात नात्यातील आजारी रुग्णांची सेवा करणे हे दुरपास्त होत चालले आहे. अशा परिस्थितीतही येथील माजी नगरसेवक दादासाहेब ...

सतरा वर्षांत शंभरवर बेवारस रुग्णांना जीवदान
सध्याच्या धावपळीच्या जगात नात्यातील आजारी रुग्णांची सेवा करणे हे दुरपास्त होत चालले आहे. अशा परिस्थितीतही येथील माजी नगरसेवक दादासाहेब शिंगण यांनी २००३ पासून सामाजिक बांधीलकी जोपासत गेली सतरा वर्षे मलकापूरसह कऱ्हाड परिसरात आजारी पडलेल्या बेवारस रुग्णांवर उपचार करण्याचा जणू वसाच घेतला आहे. शहरातील विविध ठिकाणी बेवारस व अनाथ व्यक्ती फिरत असतात. अनेकवेळा अशा बेवारस व्यक्ती आजारी पडतात. असे रुग्ण हालचाल न करता आल्यामुळे रस्त्यानजीकच आसरा घेऊन झोपतात. अशावेळी त्या परिसरातील नागरिक दादा शिंगण यांना फोन करतात. शिंगणही आपल्या मित्रांना सोबत घेऊन अशा रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करतात. गत सतरा वर्षांपासून सामाजिक काम करत दादा शिंगण यांनी १०८ रुग्णवाहिकेतून तब्बल १०९ बेवारस रुग्ण रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी सात रुग्ण उशिरा रुग्णालयात नेल्याने मृत्युमुखी पडले.
- चौकट
स्वखर्चाने केले अंत्यसंस्कार
माजी नगरसेवक दादा शिंगण यांनी आजअखेर १०२ रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले आहे. त्यापैकी काहीजणांच्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांपर्यंत पोहोचविले आहे, तर काहींना सातारा येथे भिक्षागृहात पाठविले आहे. विविध कारणांनी बेवारस मृत झालेल्या ४३ बेवारस मृतदेहांवरही शिंगण यांनी स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले आहेत.
- कोट
उपचारानंतर संबंधितांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येतो. तो आनंद पाहून समाधान वाटते. एखाद्या बेवारस व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझ्या सामाजिक कामाची पोहोच पावती आहे.
- दादासाहेब शिंगण
माजी नगरसेवक, मलकापूर
फोटो : ०२केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड, मलकापूरसह परिसरात बेवारस स्थितीत रस्त्यानजीक पडलेल्या रुग्णाला दादा शिंगण तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतात.