साताऱ्याच्या उद्योग क्षेत्राची आता ‘आयटी पार्क’कडे वाटचाल !
By दीपक देशमुख | Updated: October 3, 2025 17:55 IST2025-10-03T17:55:06+5:302025-10-03T17:55:44+5:30
राजकीय जोडे बाजूला ठेवण्याची गरज..

साताऱ्याच्या उद्योग क्षेत्राची आता ‘आयटी पार्क’कडे वाटचाल !
दीपक देशमुख
सातारा : सातारा जिल्ह्यातील युवक रोजगारांसाठी पुण्या-मुंबईत स्थलांतर करतात. युवा शक्तीची ही माेठी ऊर्जा सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी खर्ची पडावी. यासाठी सातारा जिल्ह्यात माेठे प्रकल्प साकारले जात आहेत. त्यापैकीच एक असलेल्या आयटी पार्क प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा उद्योग क्षेत्रात सीमोल्लंघन करीत आहे.
प्रस्तावित आयटी पार्कसाठी नागेवाडी, लिंब खिंड येथील ४२ हेक्टर जागेचा एमआयडीसीकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेचा अहवाल एमआयडीसीने मुख्यालयास पाठवला आहे. तेथून हा अहवाल उद्योग मंत्रालयास सादर होणार आहे. या अहवालानंतर शासनाकडून अधिसूचना निघणार आहे. यामुळे आयटी पार्क प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची आशा सातारकरांना आहे.
आयटी पार्कसाठी हवी आणखी जागा..
महसूल विभागाच्या लिंब खिंड येथील ४२ हेक्टर हस्तांतरणाचा प्रश्न सुटल्यानंतर दि. २९ ऑगस्टला जागेचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे ही जागा उपलब्ध होणार असली, तरी आयटी पार्कचा विस्तारासाठी ती कमी पडू शकते. आयटी पार्कमुळे आजूबाजूच्या गावांचाही विकास होणार आहे. अनेक आयटी कंपन्या आजूबाजूच्या गावांतही स्थिरावू शकतात. त्यामुळे विस्तारासाठी आणखी जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
राजकीय जोडे बाजूला ठेवण्याची गरज..
राजकीय जोडे बाजूला ठेवून कारभार केल्यामुळे सातारा जिल्हा बँकेने प्रगती केली आहे. त्याच धर्तीवर साताऱ्यातील आयटी पार्क प्रकल्पात मोठ्या कंपन्या येण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. एक उपमुख्यमंत्री, चारही मंत्री व तीन खासदार यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याही अनुभवाचा फायदा घेता येऊ शकतो.
लिंब खिंडीतील ४२ हेक्टर जागेचा ड्रोन सर्व्हे झाल्यानंतर फिजिबिलिटी अहवाल एमआयडीसी मुख्यालयाकडे देण्यात आला आहे. शासनाकडून अधिसूचना निघाल्यानंतर एमआयडीसीमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. - अमितकुमार सोंडगे, एमआयडीसी, प्रादेशिक अधिकारी
आयटी पार्क लवकरात लवकर व्हावा. यामुळे स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगार मिळेल. यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेलाही ऊर्जितावस्था येईल. साता-याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. - संजोग मोहिते, अध्यक्ष, मास