सातारचं पालकमंत्रिपद पुन्हा परजिल्ह्याला!

By Admin | Updated: November 12, 2014 22:51 IST2014-11-12T21:55:46+5:302014-11-12T22:51:58+5:30

‘पाटण’चा विषय संपला : आता लक्ष ‘माण’कडे

Satara's Guardian Minister again on the ground! | सातारचं पालकमंत्रिपद पुन्हा परजिल्ह्याला!

सातारचं पालकमंत्रिपद पुन्हा परजिल्ह्याला!

सातारा : शेवटच्या टप्प्यापर्यंत शिवसेना आणि भाजपचे जुळून न आल्याने दोघांच्याही दिशा आता वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे सेनेमुळे शंभूराज देसाई यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती ती फोलच ठरली आहे. दरम्यान, भाजपच्या साथीला गेलेले ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देऊन पालकमंत्रिपद देतील, अशी आशा सातारकरांना आहे. नाहीतर पुन्हा एकदा पालकमंत्रिपद परजिल्ह्यात जाण्याची शक्यता आहे.
प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखेखाली जिल्ह्याचे सर्व निर्णय होत असतात. त्यामुळे पालकमंत्रिपदाला मोठे महत्त्व असते. मागील २० वर्षांचा विचार करता जिल्ह्यातील फक्त दोघांनाच पालकमंत्रिपदाचा मान मिळाला आहे. बाकीचे तीन पालकमंत्री बाहेरील जिल्ह्यातीलच होते.
१९९५ ला शिवसेना-भाजप युतीची सत्ता राज्यात आली. त्यावेळी या नव्या सरकारला काही अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे आमदार हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश होता. त्यावेळी पाटील यांना सातारचे पालकमंत्रिपद दिले होते. ते जवळपास साडेचार वर्षे पालकमंत्रिपदावर होते. त्यानंतर १९९९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यावेळी अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद आले. २००४ च्या निवडणुकीत पुन्हा आघाडी शासनाची सत्ता आली व सातारच्या पालकमंत्रिपदाची धुरा तत्कालीन ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. साधारणपणे दीड ते दोन वर्षांचा कार्यकाळ वळसे-पाटील यांना मिळाला. त्यानंतर जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे पालकमंत्रिपद आले. म्हणजे १९९५ ते २००५ पर्यंत इतर जिल्ह्यातील मंत्र्यांनी सातारचे पालकमंत्रिपद भूषविले. १० वर्षांनंतर हे पद जिल्ह्याकडे आले. २००९ मध्ये विधानसभ निवडणुकीनंतरही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रामराजेंकडेच ठेवण्यात आले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१३च्या मध्यावर पक्षात फेरबदल केला. त्यामुळे १९९५ पासून मंत्री असणाऱ्या रामराजेंचे पालकमंत्रिपद गेले. त्यांची नियुक्ती राज्य नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदावर करण्यात आली. रामराजेंनंतर कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना एक वर्षाहून अधिक काळ मिळाला.
आता राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे सातारचे पालकमंत्री होणार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. त्यातच सेनेबरोबर भाजपची युती झाली असती तर कदाचित पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या रूपाने जिल्ह्यात पालकमंत्रिपद मिळाले असते पण ती शक्यता आता पूर्ण मावळली आहे. आता राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्याकडेच लक्ष लागले आहे. ‘रासप’ भाजपबरोबर आहे. त्यामुळे जानकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद देण्याची चर्चा सुरू आहे. जानकरांना मंत्रिपद मिळाले तर त्यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा येऊ शकते. जानकर हे माण तालुक्यातील पळसावडे येथील आहेत. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात पालकमंत्रिपद राहू शकते. जानकर यांची मंत्रिपदी वर्णी न लागल्यास सुमारे नऊ वर्षांनंतर पुन्हा पालकमंत्रिपद दुसऱ्या जिल्ह्याकडे जाणार आहे. (प्रतिनिधी)

तिघेही पुणे जिल्ह्यातील...
१९९५ पासून सातारा जिल्ह्याला प्रथम तीन पालकमंत्री लाभले. ते तिघेही पुणे जिल्ह्यातील होते. युती शासनाच्या काळात इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, बारामतीचे अजित पवार आणि आंबेगावचे दिलीप वळसे-पाटील. यंदाही हा मान कोल्हापूर किंवा पुणे जिल्ह्यातील एखाद्या मंत्र्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Satara's Guardian Minister again on the ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.