Satara ZP Election: मंद्रुळकोळे गटात सर्वाधिक, तळदेवमध्ये सर्वात कमी मतदार
By नितीन काळेल | Updated: December 9, 2025 19:51 IST2025-12-09T19:50:26+5:302025-12-09T19:51:07+5:30
२१ लाख ९१ हजारांवर मतदारांची नोंद; अंतिम यादी लवकरच

Satara ZP Election: मंद्रुळकोळे गटात सर्वाधिक, तळदेवमध्ये सर्वात कमी मतदार
नितीन काळेल
सातारा : जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी निवडणूक होणार असून प्रारूप यादीनुसार पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे गटात सर्वाधिक ४३ हजारांवर तर महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटात सर्वांत कमी म्हणजे १७ हजारांहून अधिक मतदार असतील. तसेच जिल्ह्यातील सर्व ६५ गटांतील एकूण मतदारांची संख्या २१ लाख ९१ हजारांवर आहे. तरीही अंतिम यादीनुसार मतदार संख्येत काही बदल होऊ शकतो.
जिल्हा परिषदेची निवडणूक आता तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. यापूर्वी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान झाले होते. मार्च २०२२ मध्ये पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींचा कारभार प्रशासकाकडे गेला. मागील पावणे चार वर्षांपासून प्रशासक राजवट आहे.
आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार असल्याने प्रशासकांची राजवटही संपणार आहे. तर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची अंतिम रचना होऊन आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. तर या निवडणुकीसाठी गट आणि गणनिहाय मतदारांची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. गटांसाठी २१ लाख ९१ हजार ३७४ मतदार आहेत.
सातारा जिल्हा परिषदेसाठी एकूण ६५ गट आहेत. तर ११ पंचायत समितीत १३० गण आहेत. यामध्ये सर्वाधिक गटांची संख्या कराड तालुक्यात १२ आहे. तर सर्वात कमी गट हे महाबळेश्वर तालुक्यात अवघे दोन आहेत. या गटांतील प्रारूप मतदार यादीनुसार पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे गटात सर्वाधिक ४३ हजार २१४ मतदार आहेत.
तर सर्वांत कमी मतदार हे महाबळेश्वर तालुक्याच्या तळदेव गटात १७ हजार ५२५ आहेत. महाबळेश्वर तालुक्यात भिलार गटही आहे. या गटातील मतदारसंख्याही कमीच आहे. प्रारुपनुसार भिलार गटात १८ हजार ७३२ मतदार आहेत. जिल्ह्यातील गटांतील मतदारांचा विचार करता १७ हजार ते ४३ हजारांवर एका गटात मतदार आहेत. तर पाटण तालुक्यातील अनेक गटात अधिक मतदारसंख्या आहे.
जिल्हा परिषद गट - पंचायत समिती गण
वाई- ०४ ०८
महाबळेश्वर- ०२ ०४
खंडाळा- ०३ ०६
फलटण- ०८ १६
माण- ०५ १०
खटाव- ०७ १४
कोरेगाव- ०६ १२
सातारा- ०८ १६
जावळी- ०३ ०६
पाटण- ०७ १४
कऱ्हाड- १२ २४
प्रारुपनुसार सर्वाधिक मतदारांचे गट...
तालुका गट - मतदार संख्या
पाटण मंद्रुळकोळे - ४३,२१४
पाटण काळगाव - ४२,६६७
सातारा वर्णे - ४१,१००
सातारा लिंब - ४०,६९९
पाटण मल्हारपेठ - ३९,४४१
पाटण मारुल हवेली - ३८,९५५
माण कुकुडवाड - ३८,२९१