सातारा : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दरवर्षी एक वासरू जन्माला येणे, दुग्ध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थांपासून उत्पन्नात वाढ करण्यासाठी पंचसूत्री राबविण्यावर भर दिला असून पशुवैद्यकीय अधिकारीही गावांत जाऊन सेवा देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना गतिमान सेवा मिळत आहे. तसेच आता कामधेनू दत्तक ग्राम योजना व नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २४ गावांची निवड करून सेवेला आणखी बळकटी देण्यात आलेली आहे.सातारा जिल्ह्यात सध्या जिल्हास्तरीय १७१ आणि राज्यस्तरावर २२ असे एकूण १९३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या पशुधनास सेवा उपलब्ध करून देण्यात येते. पण, आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना आणखी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पशुपालकांकडील पशुधनाची क्षमता वाढविण्यावर भर देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. याअंतर्गत पशू प्रजनन, आरोग्य, व्यवस्थापन, पशुधनासाठी चारा आणि पशुखाद्य या पंचसूत्रीवर भर देण्यात आलेला आहे.पंचसूत्रीनुसार दरवर्षी एक वासरू जन्माला येणे, दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थापासून उत्पन्नात वाढ करणे याबाबी राबविण्यासाठी मोठा वाव आहे. त्यामुळे पंचसूत्रीची ग्रामीण भागात चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक गावात सेवा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवार आणि शनिवार या दिवशी मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. तर इतर दिवशी कार्यक्षेत्रातील इतर गावांत सेवा देण्यासाठी गाव भेट वार ठरविले आहेत.याची सुरुवात १ डिसेंबरपासूनच झाली आहे. हे पशुवैद्यकीय अधिकारी आजारी जनावरांना औषधोपचार करतील. तसेच जनावरांना लसीकरण, कृत्रिम रेतन, जनावरांतील वंध्यत्व निवारण शिबिर घेणे, १०० टक्के जनावरांचे जंत निर्मूलन, पशुपालनातील पंचसूत्रीबाबत जागृती करतील. यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात दिली जाणारी सेवा आणखी चांगली आणि गतिमान झाल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे.
कामधेनू अंतर्गत २४ गावांची निवडतालुका - गावेसातारा - जकातवाडी, कुरूण अन् कुशीकोरेगाव - धुमाळवाडी, साप अन् रणदुल्लाबादखटाव - अनफळे, कलेढोणमाण - धुळदेव, पिंगळी बुद्रुकफलटण - कोऱ्हाळे, दालवडी अन् गुणवरेखंडाळा - खेड बुद्रुक, वाघोशी-कराडवाडीवाई - कनूर, वहगाव-महुडेकरवाडीमहाबळेश्वर - राजपुरी अंब्रळजावळी - रायगाव, गोटेघरकऱ्हाड - वनवासमाची, भांबेपाटण - केळोली-खराडवाडी-पडळोशी अन् काढणे
सातारा जिल्ह्यातील पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने दरवर्षी एक वासरू जन्माला येणे तसेच दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून उत्पन्नात वाढ करणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी पशू प्रजनन, आरोग्य, व्यवस्थापन, पशुचारा आणि पशुखाद्य ही पंचसूत्री ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविण्यासाठी ‘पशुवैद्यकीय अधिकारी आपल्या गावी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी