सातारा : रस्त्यातील खड्डे मुजविण्यासाठी चक्क काळी माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:22 IST2018-09-19T13:18:52+5:302018-09-19T13:22:44+5:30
राज्यात सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पावसाळ्यात पडलेले मोठमोठे खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीचा वापर केला जात आहे. यामुळे या रस्त्याची आता माती झाली आहे.

सातारा : रस्त्यातील खड्डे मुजविण्यासाठी चक्क काळी माती
वाठार स्टेशन : राज्यात सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पावसाळ्यात पडलेले मोठमोठे खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीचा वापर केला जात आहे. यामुळे या रस्त्याची आता माती झाली आहे.
सातारा-लोणंद पुणे, सातारा-फलटण-बारामती अहमदनगर अशी सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेला टोल फ्री रस्ता पावसाळ्यापूर्वीच खड्ड्यात गेला होता. त्यानंतर सलग नव्वद दिवस पडलेल्या पावसाने असणारा रस्त्याही खड्ड्यात गेला. संपूर्ण रस्ताच सध्या धूळखात पडला आहे. या रस्त्यावर प्रवास करणे म्हणजे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण दिल्यासारखेच आहे.
या रस्त्यावर दुचाकी चालवणं ही आता एक प्रकारची शिक्षा समजली जात आहे. अनेकांनी आता या रस्त्याला कंटाळून पर्यायी मार्ग वापरण्याचाच मार्ग निवडला आहे. त्यातच वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे तर या रस्त्यावरील प्रवास अधिकच महाग झाला आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे ही या रस्त्याची पहिली समस्या नाही. या रस्त्यावर प्रवास मालवाहतूक करताना कोणत्याही प्रकारचा टोल लागत नाही. क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेली वाहतूकही सोयीस्कररित्या होत असल्याने अनेकांनी या रस्त्याचा मार्ग निवडला आहे.
एक तर या रस्त्यावर सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करावी किंवा या रस्त्याची देखभाल दुरुस्तीसाठी खासगी कंपनीकडे देऊन या कंपनीला टोल आकारण्याची परवानगी द्यावी. या रस्त्यावर टोल नाका सुरू झाला तर या रस्त्यावर सुरु असलेली निमी अवजड वाहतूक कमी होईल व या रस्त्याचे तसेच या रस्त्यावरील असलेल्या नदीवरील पुलाचे आयुष्यमान वाढेल अन्यथा सध्याचा आरळे पूल सावित्री पूल झाल्याशिवाय राहणार नाही, अश्ी भीती वाहनचालक व्यक्त करत आहे.
या रस्त्यावर असलेली अवजड वाहतूक विचारात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात माती भरण्यापेक्षा चांगल्या पध्दतीने खडी डांबर भरून हे काम करावे.
- दत्तात्रय भोईटे,
माजी सरपंच तडवळे