सातारा : लोणंदकडे जाणारी वाहने पारगावच्या स्मशानभूमीत, दिशादर्शक फलकामुळे फसगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 18:19 IST2018-02-19T18:13:08+5:302018-02-19T18:19:31+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव, ता. खंडाळा येथे गावांची दिशा दर्शविणारा सूचनाफलक चुकीच्या पद्धतीने लावला गेल्याने वाहन चालकांची दिशाभूल होत आहे. परिणामी लोणंदकडे जाणारी अनेक वाहने चक्क पारगावच्या स्मशानभूमीत पोहोचत असल्याचे दिसत आहे.

सातारा : लोणंदकडे जाणारी वाहने पारगावच्या स्मशानभूमीत, दिशादर्शक फलकामुळे फसगत
खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव, ता. खंडाळा येथे गावांची दिशा दर्शविणारा सूचनाफलक चुकीच्या पद्धतीने लावला गेल्याने वाहन चालकांची दिशाभूल होत आहे. परिणामी लोणंदकडे जाणारी अनेक वाहने चक्क पारगावच्या स्मशानभूमीत पोहोचत असल्याचे दिसत आहे.
महामार्गावरून लोणंदकडे जाणाऱ्या वाहनचालकांना रस्ता लक्षात यावा, यासाठी गावांच्या नावासह दिशा दाखवणारा सूचना फलक लावण्यात आला आहे. या फलकावरील लोणंदकडे जाणारा बाण लक्षात घेऊन अनेक वाहनचालक लगेचच वळण घेऊन पारगावमधून पुढे जातात.
पारगावमधून गावाबाहेर हा रस्ता स्मशानभूमीकडे जातो. त्यानंतर रस्त्याची चूक लक्षात आल्यावर वाहने परत महामार्गाकडे येतात. विशेषत: रात्रीच्या वेळी अनेकांची फसगत होते. वास्तविक हा सगळा प्रकार सूचना फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने होत आहे.
मात्र, हायवे प्रशासनाच्या या कामगिरीचा नाहक त्रास वाहनचालकांना आणि स्थानिक ग्रामस्थांनाही होत असतो. त्यामुळे हा फलक महामार्गावरील पारगावच्या ओढ्यावरील पूल ओलांडल्यानंतर लावण्यात यावा अथवा बाण चिन्हाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.