सातारा : प्रवासात सापडलेले बारा तोळे सोने केले परत, लिंब येथील दाम्पत्याचा प्रामाणिकपणा; पोलिसांनी केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:26 IST2018-01-23T15:21:21+5:302018-01-23T15:26:04+5:30
एसटी प्रवासामध्ये नजरचुकीने प्रत्यक्ष हाती आलेले सुमारे चार लाखांची किंमत असलेले १२ तोळे सोन्यांचे दागिने प्रवासी दाम्पत्यास परत करून लिंब येथील एका दाम्पत्याने आम्ही सातारकर प्रामाणिक आणि सुसंस्कृत असल्याचे सर्वोत्तम उदाहरण दाखवून दिले आहे.

सातारा : प्रवासात सापडलेले बारा तोळे सोने केले परत, लिंब येथील दाम्पत्याचा प्रामाणिकपणा; पोलिसांनी केले कौतुक
गोडोली (सातारा) : एसटी प्रवासामध्ये नजरचुकीने प्रत्यक्ष हाती आलेले सुमारे चार लाखांची किंमत असलेले १२ तोळे सोन्यांचे दागिने प्रवासी दाम्पत्यास परत करून लिंब येथील एका दाम्पत्याने आम्ही सातारकर प्रामाणिक आणि सुसंस्कृत असल्याचे सर्वोत्तम उदाहरण दाखवून दिले आहे.
बसस्थानक पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश केशव गोरे (रा. दिघी पुणे) हे आपल्या कुटुंबाच्या भेटीसाठी पुण्याहून चिपळूणला गेले होते. त्यानंतर ते चिपळूणहून रत्नागिरी-सातारा या बसने परतीचा प्रवास करत असताना सातारा शहर बसस्थानकात उतरल्यानंतर बारा तोळे सोने व काही रोख रक्कम असलेली आपली बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बसमध्ये शोधाशोध केल्यानंतर त्यांना एक बॅग मिळाली; मात्र ती त्यांची नव्हती. त्यामुळे चोरीच्या संशयाने त्यांनी बसस्थानक पोलिस चौकी गाठली. घडलेला प्रकार सांगून तक्रार घेण्यास विनंती केली.
इतक्यात दिनकर पांडुरंग सावंत (रा. लिंब ता. सातारा) हे आपल्या पत्नीसमवेत बसस्थानक पोलिस चौकीत आले व त्यांनी पोलिस हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार यांना बसमध्ये प्रवास करून पोवई नाक्यावर उतरताना घाई गडबडीत नजरचुकीने आपण ही बॅग घेऊन गेल्याचे सांगत पोलिसांच्या समक्ष बॅगमधील साहित्याची खात्री पटून सावंत यांनी गोरे यांची बॅग प्रामाणिकपणे परत केली.
दिनकर सावंत व त्यांच्या पत्नीने दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल गोरे दाम्पत्याचे डोळे तर भरून आलेच; पण उपस्थितांमध्येही दिनकर सावंत यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा सुरू होती.