सातारा : कुत्र्यांचा पाठलाग चुकविताना भेकर जलतरण तलावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 19:05 IST2018-04-27T19:05:07+5:302018-04-27T19:05:07+5:30
कुत्र्यांचा पाठलाग चुकविताना एक भेकर महाबळेश्वर शहरात घुसले. जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असताना ते छत्रपती शिवाजी चौकातील सांस्कृतिक भवनामधील बंद जलतरण तलावात पडले.

सातारा : कुत्र्यांचा पाठलाग चुकविताना भेकर जलतरण तलावात
महाबळेश्वर : कुत्र्यांचा पाठलाग चुकविताना एक भेकर महाबळेश्वर शहरात घुसले. जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असताना ते छत्रपती शिवाजी चौकातील सांस्कृतिक भवनामधील बंद जलतरण तलावात पडले.
याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वर परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर जंगली प्राणी आहेत. ते अन्न व पाण्याच्या शोधात शहरानजीक येतात. असेच एक भेकर गुरुवारी दुपारी शहर परिसरात आले. यावेळी कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. यामुळे घाबरलेले भेकर शहरात इकडे तिकडे धावत होते. अन् त्यातून चुकून बंद अवस्थेतील जलतरण तलावात पडले.
ही घटना प्राणीमित्र राहुल लोहार व त्यांच्या मित्रांनी पहिली. त्यांनी याची माहिती वनविभागास दिली. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील भेकर जलतरण तलावात पोहण्याचा प्रयत्न करीत असलेले दिसले. त्यांनी प्राणी मित्रांच्या मदतीने विनाविलंब पाण्यात उतरून भेकराला बाहेर काढले.
साधारण आठ ते नऊ महिन्यांचे भेकर होते. श्वानांच्या नखांनी भेकराच्या अंगावर तर पळाल्यामुळे पुढील दोन्ही पायांच्या नखांनाही मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. वन विभागाने त्यास हिरडा विश्रामगृहात पिंजऱ्यांमध्ये ठेवले. त्याच्यावर उपचार करून सायंकाळी त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांनी दिली.