गणेशोत्सवाची लगबग; सातारकरांना डीजेच्या आवाजाची धास्ती, ३०० हून अधिक इमारती धोकादायक
By सचिन काकडे | Updated: August 13, 2025 16:10 IST2025-08-13T16:09:48+5:302025-08-13T16:10:12+5:30
राजपथावरील 'त्या' घटनेच्या आठवणी आजही जाग्या..

गणेशोत्सवाची लगबग; सातारकरांना डीजेच्या आवाजाची धास्ती, ३०० हून अधिक इमारती धोकादायक
सचिन काकडे
सातारा : गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाची सातारकांनी धास्ती घेतली आहे. पहिल्याच आगमन मिरवणुकीत डीजेच्या दणक्याने मिरवणूक मार्गावरील अनेक इमारती हादरल्या. यातील काही इमारती तर इतक्या जुन्या आणि धोकादायक आहेत की त्या कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. यंदाच्या उत्सवातही मोठ्या आवाजाची भिंत उभी राहिली तर ११ वर्षांपूर्वी राजपथावरील 'त्या' दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
राजपथावरील 'त्या' घटनेच्या आठवणी आजही जाग्या..
सप्टेंबर २०१४ चा दिवस सातारकरांच्या मनात अजूनही ताजा आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत, डीजेच्या अतितीव्र आवाजाने राजपथावरील एका इमारतीची भिंत कोसळली होती. या भीषण दुर्घटनेत तीन निष्पाप जिवांचा बळी गेला. चंद्रकांत भिवा बोले, उमाकांत गजानन कुलकर्णी आणि गजानन श्रीरंग कदम या तिघांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर सातारकरांनी माणुसकी दाखवत सर्व सण-उत्सवामधून डीजेला कायमचे हद्दपार केले होते.
८ इमारती अतिधोकादायक
नगरपालिकेच्या नोंदीनुसार, साताऱ्यात ३०० हून अधिक इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी मिरवणूक मार्गावरील १५२, १५५ सदाशिव पेठ, पंचमुखी गणेश मंदिर, कमानी हौद ते शेटे चौक, शेटे चौक, प्रतापगंज पेठ येथे ८ इमारती अतिधोकादायक आहेत.
..तर कुणाची जबाबदारी?
सोहळ्यात डीजेचा वापर झाल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात? एखादी दुर्घटना घडली, तर त्याचे बळी कोण असतील? याला जबाबदार कोण? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. तरुणांनी केवळ आपल्या आनंदासाठी इतरांच्या जीवाशी खेळू नये, असा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
पुन्हा एकदा डीजेची भिंत..
- ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात तरुणांच्या हट्टापायी डीजेची भिंत उभी राहिली आहे. आगमन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाची तीव्रता अनेकांना जाणवली.
- या दणक्यामुळे लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आणि अनेकांना २०१४ च्या घटनेची आठवण झाली. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा आग्रह धरला आहे, काही मंडळांनी डीजेला प्राधान्य दिले आहे.
राजपथावर घडलेली ती घटना कधीही न विसरणारी आहे. डीजे वाजला नसता तर कदाचित ही घटना घडली नसती. विसर्जन मार्गावर आजही अनेक धोकायदायक इमारती आहेत. त्यामुळे गणेश मंडळांनी डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा आग्रह धरायला हवा. मिरवणूक सोहळ्यात जर एखार्दी इमारत कोसळली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. - प्रेरणा बेलोशे, सातारा
सण, उत्सव आनंदासाठी व मनाच्या शांततेसाठी असतात. या उत्सवांमध्ये कर्णकर्कश आवाज, गोंगाट करून श्रद्धा सिद्ध होत नाही. ध्वनिप्रदूषणाचा वृद्ध, रुग्ण, गरोदर महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होता. हे समजावून घेऊन मंडळांनी ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. - शिवाजी राऊत, सामाजिक कार्यकर्ते