सातारा, कऱ्हाड , फलटण शहरे केरोसीनमुक्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 03:42 PM2019-05-07T15:42:10+5:302019-05-07T15:45:15+5:30

सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व फलटण ही शहरे केरोसीनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला यश आले आहे. या शहरांतील महिन्याकाठी जाणारे १५ टँकर आता बंद झाले आहेत.

Satara, Karhad, Phaltan city is free from kerosene. | सातारा, कऱ्हाड , फलटण शहरे केरोसीनमुक्त..

सातारा, कऱ्हाड , फलटण शहरे केरोसीनमुक्त..

Next
ठळक मुद्देसातारा, कऱ्हाड , फलटण शहरे केरोसीनमुक्त..पुरवठा विभागाची कार्यवाही : १२ हजार लिटरची झाली बचत

सागर गुजर 

सातारा : जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व फलटण ही शहरे केरोसीनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला यश आले आहे. या शहरांतील महिन्याकाठी जाणारे १५ टँकर आता बंद झाले आहेत.

या तिन्ही शहरांमधील रेशनिंग दुकानदार महिनाकाठी १५ टँकर रॉकेलची मागणी करत होते. या शहरांमध्ये प्रत्येक कुटुंबात गॅस कनेक्शन असतानाही रॉकेलची मागणी कशी होते? याबाबत शंका आल्याने पुरवठा विभागाने या शहरांत कार्यवाही सुरू केली.

यासाठी शहरांतील गॅस एजन्सीजची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये केरोसीन मागणी करणाऱ्या रेशनिंग ग्राहकांकडे गॅस आहे का? याची तपासणी करण्यात आली. अनेकांनी रेशनिंग कार्डवर गॅसचा उल्लेख टाळला होता. त्यामुळे रेशनिंग व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर केरोसीनची मागणी करत होते.

गॅसच्या तपासणीत अनेकांनी कूरकूर केली. काही रेशनिंग व्यावसायिक ही माहिती लपवत होते. मात्र प्रशासनाने दट्ट्या लावला. केरोसीन घेणाऱ्या रेशनिंग ग्राहकांकडून गॅस नससल्याचे हमीपत्र घेण्यात आले. तसेच माहिती दडविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला होता. सलग तीन महिने चाललेल्या या कार्यवाहीमध्ये केरोसीनची मागणी करणाऱ्या अनेक ग्राहकांकडे गॅस कनेक्शन असल्याचे आढळून आले.

दरम्यान, ज्या ग्राहकांकडे गॅस कनेक्शन नाही, अशा ग्राहकांची माहिती मिळाल्याने त्यांना शासनाच्या उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस देण्यात आला. या मोहिमेमुळे तब्बल ८० किलो लिटर केरोसीन वाचले आहे. महिन्याकाठी १ लाख ८० हजार लिटर केरोसीनची बचत झाली. रेशनिंगला प्रति लिटर ३० रुपयांनी दर पकडला तरी त्याची किंमत तब्बल ५४ लाख रुपये इतकी होते.

जिल्हा पुरवठा विभागाने हे पाऊल उचलल्याने काळाबाजारावर आळा बसला आहे. ग्राहकांची मागणी नसताना रॉकेलची मागणी करणाऱ्या रेशनिंग पुरवठादारांना यामुळे चाप बसला. त्यामुळे ग्राहकांचे पितळही उघडे पडले आहे.


जिल्ह्यातील ज्या ग्राहकांना केरोसीनची आवश्यकता आहे, त्यांना ते दिले जाईल. मात्र जास्तीत जास्त ग्राहक हे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जोडून गरीब जनतेला गॅसचा लाभ दिला जाणार आहे.
- स्नेहा किसवे-देवकाते,
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Satara, Karhad, Phaltan city is free from kerosene.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.