कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 06:22 IST2025-10-27T06:22:33+5:302025-10-27T06:22:51+5:30

प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा निंदनीय प्रयत्न

Satara female doctor death case victim will get justice and the accused will be punished in any case says Devendra Fadnavis | कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही

कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही

फलटण (जि. सातारा) : ‘मी फलटणला येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न झाला. आमची लहान बहीण जी डॉक्टर होती, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. कोणत्याही परिस्थितीत त्या बहिणीला न्याय मिळणार आहे. आरोपींना शिक्षा मिळणार आहे; परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा निंदनीय प्रयत्न होतोय. महाराष्ट्राला देवाभाऊ माहीत आहे. थोडीशी जरी शंका माझ्या मनात असती, तर हा कार्यक्रम रद्द केला असता,’ असे स्पष्ट मत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. फलटण येथील विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी फलटण येथे आले असता ते बोलत होते. 

गोपाळ बदनेचा मोबाइल जप्त, ५ दिवस पोलिस कोठडी

फलटण/सातारा : निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला फलटण पोलिसांनी रविवारी रात्री फलटण न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने बदनेला  ३० ऑक्टाेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या चाैकशीतून आता डाॅक्टर युवतीच्या आत्महत्येचे रहस्य उलगडणार आहे. बदने शनिवारी रात्री फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला हाेता.

दिवसभर कसून चाैकशी

बदनेविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला फलटण येथून रात्री साडेतीन वाजता साताऱ्यात आणण्यात आले. त्यानंतर सकाळी पुन्हा त्याला फलटण येथे नेण्यात आले. दिवसभर फलटण येथे त्याची पोलिस अधीक्षक व वरिष्ठ अधिकारी कसून चाैकशी करत होते. नंतर त्याला न्यायालयात हजर केले.

मोबाइल उलगडणार रहस्य

गोपाळ बदने व प्रशांत बनकर हे दोघेही सध्या अटकेत आहेत. या दोघांचेही मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. बनकरच्या मोबाइलमधून चॅटिंग आढळून आले असून, हे चॅटिंग पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा आहे, तर पीएसआय बदने याच्या मोबाइलमधील चॅटिंग व काॅल डिटेल्स पोलिसांकडून तपासले जात आहेत.

आत्महत्या नव्हे, संस्थात्मक हत्या आहे : राहुल गांधी

‘ज्यांच्या हातात नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांनीच निरपराध डॉक्टरवर घृणास्पद अत्याचार केला. त्यातून तिने आत्महत्या केली. ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,’ असे परखड मत काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांनी रविवारी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, ‘महाराष्ट्रातील साताऱ्यात बलात्कार आणि अत्याचारामुळे त्रस्त होऊन एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. ही घटना कोणत्याही सभ्य समाजाच्या अंतःकरणाला हादरा देणारी आहे. ही तरुण डॉक्टर समाजातील इतरांचे दु:ख दूर करण्याचे स्वप्न पाहत होती; परंतु सत्तेच्या भ्रष्ट आणि गुन्हेगार संरचनेच्या पंजात सापडली. ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे. 

एसआयटी नियुक्तीची सर्वपक्षीय मागणी : वडवणी (जि. बीड) : महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची शनिवारी रात्री मंत्री पंकजा मुंडे, मानवी हक्क अभियानचे मिलिंद आवाड यांनी भेट घेऊन सांत्वन केले.  रविवारी सकाळी आ. सुरेश धस, खा. प्रणिती शिंदे, आ. धनंजय मुंडे यांनी भेट घेत प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली.

Web Title : पीड़िता को न्याय, दोषियों को हर हाल में सजा: फडणवीस

Web Summary : देवेंद्र फडणवीस ने फलटण में डॉक्टर की मौत पर न्याय का आश्वासन दिया, जांच और दोषियों को सजा मिलेगी। गोपाल बदने गिरफ्तार, जांच जारी।

Web Title : Justice for victim, punishment for culprits in any situation: Fadnavis

Web Summary : Devendra Fadnavis assures justice for the doctor's death in Phaltan, emphasizing a thorough investigation and punishment for the guilty. Gopal Badne arrested, investigation underway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.