सातारा जिल्हा रुग्णालयास नव्या शंभर डॉक्टरांचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:47 IST2019-07-17T23:44:14+5:302019-07-17T23:47:02+5:30
येत्या दोन वर्षांत ही परिस्थिती बदलणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी तब्बल शंभर डॉक्टरांना सिव्हिलमध्ये रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे

वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने सर्वच सुविधा मोफत मिळणार असल्याने खासगी हॉस्पिटल चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दत्ता यादव ।
सातारा : वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा शासकीय रुग्णालय हस्तांतरित केल्यामुळे याचा फायदा रुग्णसेवेवरही होणार असून, नव्या दमाचे तब्बल शंभर डॉक्टर रुग्णांची सेवा करण्यासाठी हातभार लावणार आहेत. एवढेच नव्हे तर खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर काही वर्षांतच सिव्हिलमध्ये बायपास सर्जरीपासून एमआरआयपर्यंत शस्त्रक्रिया होतील. त्यामुळे साहजिकच खासगी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होणार आहे.
अपुºया सोयी सुविधा आणि डॉक्टरांच्या मनुष्यबळाअभावी जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतानाच हे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यात आले, त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. हे रुग्णालय हस्तांतर झाल्यामुळे याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये साडेचारशे कर्मचारी आहेत. त्यामध्ये केवळ ४५ डॉक्टर आहेत. मात्र, येत्या दोन वर्षांत ही परिस्थिती बदलणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी तब्बल शंभर डॉक्टरांना सिव्हिलमध्ये रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. हे सर्व डॉक्टर प्रशिक्षणार्थी जरी असले तरी त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर करतील.
तसेच पाच वर्षांनंतर ही डॉक्टरांची संख्या पाचशेच्या घरात जाणार आहे. त्यामुळे चोवीस तास रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील. डॉक्टरांच्या लवाजम्याबरोबरच अत्याधुनिक सामग्रीही उपलब्ध होणार आहे. सीटीस्कॅन मशीन, एक्सरे, सोनोग्राफी मशीनबरोबरच विविध शस्त्रक्रियांसाठी लागणाºया मशीनचा त्यामध्ये समावेश असेल. जिल्हा रुग्णालयात सध्या अॅपेंडिक्स, हर्निया, सिझर यासारख्या शस्त्रक्रिया होत आहेत. मात्र, आता एमआरआयपासून बायपास सर्जरीपर्यंत सर्वच शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यामुळे खासगी रुग्णालयात होणारा लाखो रुपयांचा खर्चही वाचणार आहे. हृदयरोगावरील शस्त्रक्रिया खासगी हॉस्पिटलमध्ये कराव्या लागत असल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण उपचाराविनाच दिवस कंठत होते. परंतु आता अशा रुग्णांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा हक्काचा आधार मिळाला आहे.
मंजूर न होण्यासाठी देव घातले पाण्यात!
म्हणे साताºयात मेडिकल कॉलेज मंजूर होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले होते. कॉलेज मंजूर झाले तर आमचे दवाखाने ओस पडतील, अशी भीतीही अनेकांना होती. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने सर्वच सुविधा मोफत मिळणार असल्याने खासगी हॉस्पिटल चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
काय फायदे होणार..
अत्याधुनिक सामग्री .बायपास अन् एमआरआयची सुविधा .शंभर शिकाऊ डॉक्टरांची मदत.
पाचशे खाटांचा समावेश. खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांचे प्रमाण घटणार. तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता.