सातारा : नीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक, वीर धरणात मर्यादित पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:01 IST2018-10-26T16:55:27+5:302018-10-26T17:01:14+5:30
राज्य शासनाने खंडाळा तालुक्याचा समावेश दुष्काळी भागाच्या यादीत केला आहे. त्यासाठी विशेष योजना शासनाकडून जाहीरही केल्या जातील. मात्र, पाण्यासारख्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील धरणाची स्थिती चिंताजनक असून, या महिनाअखेरच पाणीसाठा तब्बल तीन टीएमसीने खालावला आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी वापराचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे.

सातारा : नीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक, वीर धरणात मर्यादित पाणीसाठा
खंडाळा : राज्य शासनाने खंडाळा तालुक्याचा समावेश दुष्काळी भागाच्या यादीत केला आहे. त्यासाठी विशेष योजना शासनाकडून जाहीरही केल्या जातील. मात्र, पाण्यासारख्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील धरणाची स्थिती चिंताजनक असून, या महिनाअखेरच पाणीसाठा तब्बल तीन टीएमसीने खालावला आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी वापराचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे.
मागील वर्षी २१ आॅक्टोबर २०१७ रोजी नीरा खोऱ्यातील नीरा-देवधर, भाटघर व वीर या तिन्ही धरणांतील पाणीसाठा १०० टक्के एवढा होता तर या तिन्ही धरणांत मिळून एकूण पाणीसाठा टीएमसीमध्ये ४४.६४ टीएमसी एवढा होता. त्या तुलनेत यावर्षी नीरा खोऱ्यातील नीरा-देवधर १०० टक्के, भाटघर ९९.८४ टक्के व वीर धरणात केवळ ७०.०९ टक्के एवढाच पाणीसाठा असून, तो टीएमसीमध्ये ४१.८४ टीएमसी एवढा आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा जवळपास २.८० टीएमसी एवढा कमी आहे. यावर्षी टंचाईसदृश स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यानी पाणी जपून वापरावे तसेच सूक्ष्म सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करून पाणी काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर अनधिकृत पाणी उपसा, कालव्यावरील सायपन काढून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.