सातारा : नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडून पालिकेच्या मुकादमास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 10:23 IST2018-10-27T10:22:27+5:302018-10-27T10:23:20+5:30
मरून पडलेले जनावर वेळेत का उचलले नाही, असे म्हणत सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडून पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सुकटे यांना मारहाण व दमदाटी करण्यात आली. यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

सातारा : नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडून पालिकेच्या मुकादमास मारहाण
सातारा : मरून पडलेले जनावर वेळेत का उचलले नाही, असे म्हणत सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडून पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सुकटे यांना मारहाण व दमदाटी करण्यात आली. यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
याबाबत माहिती अशी की, सदर बझार परिसरात एक जनावर मृत अवस्थेत आढळून आले. शुक्रवारी रात्री नगरसेवक विशाल जाधव यांनी याबाबत पालिकेचे मुकादम दिलीप सुकटे यांना ते जनावर तातडीने उचलण्याची सूचना केली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने सुकटे त्याठिकाणी गेले नाहीत.
सुकटे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे सदर बझार येथील पालिकेच्या हजेरी कार्यालयात आले. कर्मचाऱ्यांची हजेरी घेत असताना अचानक नगरसेवक विशाल जाधव हे त्याठिकाणी आले. तुम्ही रात्री का आला नाहीत आणि ते जनावर का उचलेले नाही, असे सांगत जाधव यांनी मारहाण व दमदाटी केल्याचा आरोप सुकटे यांनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता जाधव यांनी हजेरीचे बायोमॅट्रिक मशीनही फोडून टाकले.
हा सर्व प्रकार कर्मचाऱ्यांना कळताच सर्वांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. जोपर्यंत संबंधित नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेत नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून न जाण्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.