सातारा : राज्य शासनाने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरूच ठेवले असून गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पुणेजिल्हाधिकारीपदीबदली केली. तर सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू झाले आहे. गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची बदली करण्यात आली. पुणे जिल्हाधिकारीपदाचा डूडी हे आता पदभार घेणार आहेत. तर सातारा जिल्हाधिकारीपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील उंडेगाव, ता. बार्शी येथील रहिवाशी आहेत. १९९६ मध्ये ते राज्य प्रशासकीय सेवेत सेवेत रुजू आले. आतापर्यंत त्यांनी राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे. दरम्यान, सातारचे मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक पार पडली. या दोन्हीही निवडणुका शांततेत पार पडल्या. सुमारे दीड वर्षांचा कार्यकाल डूडी यांना सातारा येथे मिळाला. त्यांनी स्मार्ट स्कूल, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र यासह विविध विषयावर उल्लेखनीय काम केले.
सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील, जितेंद्र डुडी यांची पुण्याला बदली
By नितीन काळेल | Updated: January 2, 2025 17:12 IST