सातारा : भांडणे सोडविली म्हणून डोक्यात बॅट मारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:39 IST2018-07-04T13:37:27+5:302018-07-04T13:39:54+5:30
भांडणे सोडविल्याच्या कारणावरून लाकडी बॅट डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी गणेश जयसिंग भोसले यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : भांडणे सोडविली म्हणून डोक्यात बॅट मारली
रहिमतपूर : भांडणे सोडविल्याच्या कारणावरून लाकडी बॅट डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी गणेश जयसिंग भोसले यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार, दि. २ जुलै रोजी तक्रारदार युवराज गणपती कदम (वय ५१, रा. नहरवाडी, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते दुचाकीवरुन रहिमतपूरकडे निघाले होते. त्यावेळी बसस्थानक परिसरात त्यांच्याच गावातील काही युवकांची आणि गणेश जयसिंग भोसले यांच्यात कोणत्या तरी कारणावरून भांडणे सुरू होती.
यावेळी फिर्यादी युवराज कदम यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडवली. त्यानंतर ते गावातील लग्नानिमित्त आदर्श फाटा येथील एका मंगल कार्यालयात गेले. लग्न उरकून येत असताना गणेश भोसले व त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी रस्त्यात अडवून आमच्या भांडणात का पडला, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यावेळी गणेश भोसले याने लाकडाच्या बॅटने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेचा अधिक तपास हवालदार एस. डी. नाळे हे करीत आहेत.