सातारा : एक्स्प्रेसला थांबा नसल्याने जवानांसह कुटुंबीयांची परवड, रहिमतपूर रेल्वे स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 14:04 IST2018-01-06T13:58:31+5:302018-01-06T14:04:34+5:30
कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या रहिमतपूर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याच एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. व्यापाऱ्यांनाही धार्मिक ठिकाणी जाताना गैरसोय होत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री सातारा रेल्वेस्थानक गाठावे लागत आहे.

सातारा : एक्स्प्रेसला थांबा नसल्याने जवानांसह कुटुंबीयांची परवड, रहिमतपूर रेल्वे स्टेशन
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या रहिमतपूर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याच एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. व्यापाऱ्यांनाही धार्मिक ठिकाणी जाताना गैरसोय होत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री सातारा रेल्वेस्थानक गाठावे लागत आहे.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहराला प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. राज्यातील पहिली व देशातील दुसरी नगरपरिषद म्हणूनही रहिमतपूरची ओळख आहे. रहिमतपूरपासून चार किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन असून धामणेर रेल्वे स्टेशन म्हणूनही ओखले जाते. परंतु त्याची नोंद रहिमतपूर रेल्वे स्टेशन अशीच आहे. या रेल्वे स्टेशनचा म्हणावा असा विकास झालेला नाही.
ब्रिटिश काळापासून असलेल्या सुविधांमध्ये किरकोळ अपवाद वगळता कोणताही बदल झालेला दिसत नाही. एका पटरीवरुनच रेल्वे गाड्या धावतात. क्रॉसिंगसाठी दुसरीही पटरी आहे. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजुला रेल्वेची मुबलक जागा आहे. मात्र या जागेच्या विकासाकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे जाणवत आहे.
सातारा जिल्हा हा शूरवीर जवानांचा म्हणून ओळखला जातो. कोरेगाव तालुक्यातील बहुधा प्रत्येक गावातील युवक सैन्यात कार्यरत आहेत. रहिमतपूर शहरासह परिसरातील व खटाव तालुक्यातील सुमारे शंभर गावातील वाड्यावस्त्यांवरील जवांना महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपºयात प्रवास करण्यासाठी सोयीचा प्रवास रहिमतपूर रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
मात्र, या स्टेशनवर पॅसेंजर, कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्पे्रस याच गाड्या थांबतात. इतर महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने जवानांसह त्यांच्यारबरोबर ये-जा करणाऱ्या कुटुंबीयांची गैरसोय होते.
या स्टेशनवरुन चोवीस तासांत वीस ते पंचवीस गाड्या धावतात. देशसेवा बजावणाऱ्या जवानांना प्रामुख्याने जम्मू-काश्मिर, श्रीनगर, पंजाब, दिल्ली, राजस्थान, चंदीगड, नागालँड, आसाम आदी ठिकाणी जावे लागते. ज्या ज्या ठिकाणी कुटुंबीयांना राहण्याची सोय आहे.
त्या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेची वेळ रात्री-अपरात्री दुपारची कधीचीही असू शकते. त्यामुळे त्यांना सातारा रेल्वेस्थानकात सोडून येताना अपघात घडत आहेत. त्यामुळे रहिमतपूर रेल्वे स्टेशनमध्ये एक्स्प्रेसला थांबा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
या एक्स्प्रेसंना हवाय थांबा
रहिमतपूर रेल्वे स्थानकात गोवा-निजामुद्दीन, जोधपूर, महालक्ष्मी, हुबळी, चंदीगड एक्स्प्रेस थांबणे गरजेच्या आहेत. त्यातील गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस सातारा व कऱ्हाड येथे थांबते. या सर्व गाड्यांना रहिमतपूरलाही थांबा देणे गरजेचे आहे.