तांबवे : कराड तालुक्यातील सुपने-तांबवे जिल्हा परिषद गटातील सुमारे वीस ते पंचवीस गावांमध्ये महावितरण कंपनीकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. गावकऱ्यांच्या वतीने महावितरणच्याकराड (ओगलेवाडी) येथील विभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.म्होप्रे, भोळेवाडी, साजूर, तांबवे, डेळेवाडी, वसंतगड, आबईनगर, सुपने, केसे, वारंजी, मुंढे यांसह सुमारे २० ते २५ गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी एकत्र येत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपला तीव्र विरोध नोंदवला. ग्रामस्थांच्या मते स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढण्याची शक्यता आहे. त्याचा आर्थिक फटका सामान्य नागरिकांना बसू शकतो. त्यामुळे गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी प्रशासनाने ग्रामपंचायतींशी चर्चा करून ग्रामस्थांची संमती घ्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात अनेक ग्रामपंचायतींनी अधिकृत ठराव मंजूर केले आहेत. त्या ठरावाची प्रतही महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ग्रामपंचायतींच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांनी मनमानी पद्धतीने गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करू नये.दरम्यान, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रश्नावर महावितरण प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत असून प्रशासनाने त्वरित या विषयात हस्तक्षेप करून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तीव्र आंदोलन करणारगावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले किंवा ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर सर्व गावकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारीही ग्रामस्थांनी दर्शवली आहे. यावेळी उपस्थित सरपंच व ग्रामस्थांनी सांगितले की, ‘ग्रामस्थांच्या हिताचा विचार न करता स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय लादण्याचा प्रयत्न झाला तर त्याला जोरदार विरोध केला जाईल. गरज पडल्यास सर्व गावकरी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभे करू.’ या निवेदनावेळी संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Summary : Villagers from 25 villages protest smart meters, fearing increased bills. Gram panchayats passed resolutions opposing installation without consent. Villagers threaten road protests if demands are ignored.
Web Summary : 25 गांवों के ग्रामीणों ने स्मार्ट मीटरों का विरोध किया, बिल बढ़ने का डर जताया। ग्राम पंचायतों ने बिना सहमति के इंस्टॉलेशन का विरोध किया। ग्रामीणों ने मांगें न मानने पर सड़क पर उतरने की धमकी दी।