Sari's headache in Corona epidemic! | कोरोना महामारीत ‘सारी’ची डोकेदुखी! : रुग्णांसोबत बळींची संख्याही वाढली

कोरोना महामारीत ‘सारी’ची डोकेदुखी! : रुग्णांसोबत बळींची संख्याही वाढली

ठळक मुद्दे आजार नव्हे, हा तर लक्षणांचा समूह; ताप, सर्दी, खोकल्यासह श्वसनाचा त्रास

संजय पाटील।
क-हाड : जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढतोय आणि त्यापाठोपाठ ‘सारी’ही अनेकांचा बळी घेतोय. यापूर्वी कधीही न ऐकलेला हा आजार नवीनच असावा, असा सामान्यांचा समज. मात्र, ‘सारी’ हा मुळात आजारच नाही. तो लक्षणांचा एक समूह आहे, असे डॉक्टर सांगतात. गत काही दिवसांत या ‘सारी’ने डोके वर काढले आणि कोरोना महामारीत त्याचीही भीती वाढत गेली.

कोरोनाने मार्चअखेरीस जिल्ह्यात शिरकाव केला. तेव्हापासून आजअखेर जिल्हावासीय भीतीच्या सावटाखाली आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्याभोवती कोरोनाचा फास आवळतोय. रुग्णसंख्येबरोबरच मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडाही वाढतोय आणि ही वाढती संख्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवतेय. मुळातच कोरोना नवखा. या रोगाच्या लक्षणांपासून ते उपचार पद्धतीपर्यंत सर्वच पातळ्यांवर संभ्रम. उपलब्ध माहितीही त्रोटक़ त्यामुळे कोरोनाबाबत जिज्ञासा आणि भीतीही दिवसेंदिवस वाढत गेली. त्यातच प्रशासनाचे अनेक नवे शब्द, नवी कार्यप्रणाली सामान्यांना ऐकायला, पाहायला मिळाली. ‘कंटेन्मेंट’, ‘क्वॉरंटाईन’, ‘आयसोलेशन’ हे कधीही न ऐकलेले शब्द कानावर पडले. त्यामुळे कोरोनाची धास्ती वाढतच राहिली. या नव्या शब्दांमध्ये ‘सारी’चीही अचानक भर पडली.

‘रुग्णाचा कोरोनाने नव्हे तर सारीने मृत्यू झाला,’ असे आरोग्य विभागाकडून काहीवेळा सांगण्यात आले आणि प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या. ‘सारी’विषयी यापूर्वी कधीच काहीही ऐकिवात नव्हते. सारीने कोणी दगावल्याची घटनाही यापूर्वी कधी समोर आली नव्हती आणि अचानक कोरोना महामारीत ‘सारीचा बळी’ धक्कादायक ठरला. सध्याही सारीच्या रुग्णांची माहिती प्रशासनाकडून सांगितली जाते. त्यामुळे सारी म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना सतावतो. हा नवीन आजार असावा, असेही काहींना वाटते. मात्र, तो आजार नसून लक्षणांचा समूह असल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात. सारीचे रुग्ण यापूर्वीही होते. त्यामध्ये नवीन असे काही नाही. मात्र, कोरोना आणि सारी लक्षणांमध्ये साम्य असल्यामुळे सध्या कोरोनासोबत सारीचीही चर्चा होते एवढंच.


कोरोना हे सतरापैकी एक कारण
इन्फ्लूएंझा, एडीनो, रायनो अशा सतराहूनही अधिक विषाणूंच्या संसर्गात किंवा इतर काही जीवाणूंचा संसर्ग होऊन ‘सारी’सारखी गंभीर लक्षणे निर्माण होतात. कोरोना हे या अनेक कारणांपैकी एक कारण आहे, असे डॉक्टर सांगतात.


‘सारी’ म्हणजे काय?

  • ‘सारी’ हा आजार नसून ते इंग्रजी शब्दांचे लघुरूप आहे. त्याला इंग्रजीमध्ये ‘सिव्हीयर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस’ असे म्हटले जाते.
  • इंग्रजी शब्दाची अद्याक्षरे घेऊन ‘एसएआरआय’ म्हणजेच ‘सारी’ असे हे लघुरूप तयार झाले आहे. तोच शब्द वैद्यकीय भाषेत वापरला जातो.
  • हा आजार नसून तो लक्षणांचा एक समूह (सिंड्रोम) आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये ‘सारी’सारखी लक्षणे निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत.
  • अनेक विषाणूमुळे तसेच जीवाणूंमुळे लक्षणे निर्माण होतात. थोडक्यात फुप्फुसाचा गंभीर संसर्ग म्हणजे ‘सारी’ किंवा न्युमोनियासारखी लक्षणे म्हणजेच ‘सारी.’


दोन्हींची लक्षणे सारखीच
कोरोनाचा संशयित रुग्ण पुढच्या स्टेजमध्ये आला की त्याला सुरुवातीला खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे असतील त्यावेळी त्या रुग्णाची कोरोना चाचणी घेतली जाते. घशातील स्त्राव तपासला जातो. मात्र, एका स्टेजला कोरोना व सारी रुग्ण एकसाखेच वाटतात, असेही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.


सारीची लक्षणे
वयोवृद्ध, बालके व रोगप्रतिकारक शक्ती
कमी असलेल्यांना सारी लवकर होतो.
श्वास घ्यायला खूप त्रास होणे, धाप लागणे, खूप ताप, सर्दी, खोकला लागणे.
फुप्फुसांत सूज येणे, कमी काळात रुग्ण
गंभीर होणे.


सारीचे रूग्ण नविन नाहीत. यापुर्वीही असे रूग्ण होते. आणि सध्याही आहेत. डेंग्यू, स्वाइन फ्लूसारखेच बऱ्याच वर्षांपासून सारीचेही रूग्ण आहेत. स्वाइन फ्लू, डेंग्यु होता तेव्हाही सारी होता. सारीने दरवर्षी मृत्यू होतात; पण कोरोना व सारीची लक्षणे सारखीच असल्याने आता सारीकडे विशेषत: अनेकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
- डॉ. आमोद गडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

Web Title:  Sari's headache in Corona epidemic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.