कऱ्हाड : गडावर पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याने गडाखालून गडावर पाणी नेण्यासाठी राज्यात प्रथमच साकारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी पाणी योजनेनंतर आता किल्ले सदाशिवगडावर नक्षत्र उद्यान होत आहे. या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, २१ दुर्मीळ व वनौषधी वृक्षांची लागवडही करण्यात आली आहे. २००८ सालापासून सदाशिवगड संवर्धनासाठी झटणाऱ्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या शिरपेचात यामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे.
सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले सदाशिवगडावर आजवर शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता सदाशिवगडप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने लाखो रुपयांची कामे झाली आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी गतवर्षी शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले होते. किल्ले सदाशिवगड येथेही वृक्षारोपण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्याचवेळी नियोजित नक्षत्र उद्यानाची कल्पना रणजित पाटील यांना सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी सांगितली होती. त्यानंतर २७ नक्षत्रांनुसार नक्षत्र उद्यानात वनौषधींचे वृक्षारोपण करण्यासाठी सदाशिवगडप्रेमी अभियंता दिलीप दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू करण्यात आले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता भोपळे यांचेही सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे.
नक्षत्र उद्यानासाठी आवश्यक खड्डे काढणे, माजमापे घेऊन चरी काढणे तसेच अन्य आवश्यक कामेही गतवर्षी पूर्ण करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची पहिली लाट आणि काही दुर्मीळ वनौषधी वृक्षांची उपलब्धता न झाल्याने हे काम थांबले होते. सोमवारी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक जयंत पाटील यांच्या हस्ते वृक्ष लावत या कामाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर शिवराय ट्रेकिंग ग्रुपसह रणजित पाटील, सौरभ पाटील, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, शिवाजी पवार, जयंत बेडेकर, राहुल चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत २१ विविध नक्षत्रांनुसार आराध्य वृक्ष असलेली झाडे लावण्यात आली आहेत.
- चौकट
मावळ्यांचे परिश्रम अन् गब्बरची साथ...
नक्षत्र उद्यानासाठी बहुतांश वृक्ष हे चार त पाच वर्षांचे निवडण्यात आले आहेत. त्यामुळे या झाडांचे वजन १५ ते २० किलोच्या घरात होते. त्यामुळे हे सर्व वृक्ष पायथ्यापासून गडावर नेणे एक मोठे अग्निदिव्य होते. शिवराय ट्रेकिंग ग्रुपने सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला याकामी अनमोल सहकार्य केले आहे. त्याचबरोबर कऱ्हाडमधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ‘गब्बर ग्रुप’च्या सदस्यांनीही पाच तासांहून अधिक काळ परिश्रम घेतले.
फोटो :
कॅप्शन : सदाशिवगडावर नक्षत्र उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रणजित पाटील, सौरभ पाटील, हणमंतराव पवार, शिवाजी पवार आदी उपस्थित होते.