साताऱ्यात रिमझिम, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस जोर धरू लागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:14 IST2021-06-16T17:10:40+5:302021-06-16T17:14:16+5:30
Rain Satara: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला असून जोर धरू लागला आहे. कोयनेत तर प्रथमच आवक होऊ लागली आहे. तर साताऱ्यात रिमझिम स्वरुपात पाऊस होत असून पूर्वेकडील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते.

साताऱ्यात रिमझिम, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस जोर धरू लागला !
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला असून जोर धरू लागला आहे. कोयनेत तर प्रथमच आवक होऊ लागली आहे. तर साताऱ्यात रिमझिम स्वरुपात पाऊस होत असून पूर्वेकडील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यात यावर्षी वेळेच्या अगोदर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला काही दिवस पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. विशेष करुन धरण क्षेत्रात पाऊस चांगला पडत आहे. यामुळे सध्यस्थितीत तरी कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झालेली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ३०७८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर इतर प्रमुख धरणात अजुन आवक सुरू झालेली नाही.
त्याचबरोबर सातारा शहरात मंगळवारी सायंकाळपासून पावसाला सुरूवात झाली. रिमझिम स्वरुपात पाऊस होत आहे. बुधवारीही पाऊस झाला. यामुळे नागरिकांना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागत होते.
पूर्व भागात काही भागात रिमझिम पाऊस झाला. पण, बहुतांशी भागात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुष्काळी भागात खरीप हंगाम पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. सध्या पेरण्या रखडल्या आहेत.
कोयनेला ५३ मिलीमीटर पाऊस...
पश्चिम भागातील धरण परिसरात पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे सर्वाधिक ५३ मिलीमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत ऐकूण १९२ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर कण्हेरला ३१ तर ऐकूण ८९ मिलीमीटर पाऊस झाला. धोमला १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
जूनपासून धोम धरण परिसरात ७२ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. बलकवडीला बुधवारी सकाळपर्यंत ३६ मिलीमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत १०१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर तारळीला २५ आणि जूनपासून ९५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. खटाव तालुक्यातील येरळा धरण परिसरात अवघ्या ३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.