‘राष्ट्रवादी विद्यार्थी’ जिल्हाध्यक्षाचा शोध

By Admin | Updated: July 24, 2014 22:10 IST2014-07-24T22:04:21+5:302014-07-24T22:10:21+5:30

विद्यमान कार्यकारिणी बरखास्त : आमदारांची पत्रे गोळा करण्यावर इच्छुकांचा भर

Research of 'NCP Student' District | ‘राष्ट्रवादी विद्यार्थी’ जिल्हाध्यक्षाचा शोध

‘राष्ट्रवादी विद्यार्थी’ जिल्हाध्यक्षाचा शोध

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी आघाडी बरखास्त केल्यामुळे आता नवीन जिल्हाध्यक्ष कोण असेल, याचा शोध सुरू झाला आहे. विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदाची निवड मुलाखत घेऊनच होणार आहेत. परिणामी अनेक इच्छुकांनी आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आपली निवड व्हावी, यासाठी वरिष्ठ नेत्यापर्यंत फिल्डिंग लावली आहे. अनेकजणांनी स्थानिक आमदारांची पत्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे साहजिकच या पक्षाच्या प्रत्येक सेलच्या जिल्हाध्यक्षपदालाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी जिल्हाध्यक्षपद अथवा कार्यकारिणीवर संधी मिळावी म्हणून अनेकांची धडपड सुरू असते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांच्या सूचनेनुसार विद्यमान जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक थोरात यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे. परिणामी आता साऱ्यांच्या नजरा नवीन कार्यकारिणीबरोबरच अध्यक्ष कोण होणार याकडे आहेत. राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थी जिल्हाध्यक्षपदावर कोण येणार याचीच उत्सुकता अनेकांना आहे.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणारा आणि आक्रमक त्याचबरोबर अभ्यासू चेहरा राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षपदी हवा आहे.
विद्यमान जिल्हाध्यक्ष दीपक थोरात यांना पुन्हा संधी जर नाही मिळाली तर कार्यकारिणीतील विद्यमान पदाधिकारी विजय कुंभार, गजेंद्र मुसळे, अतुल शिंदे यांच्यापैकी एकाच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, मुलाखतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडेही अनेकांच्या नजरा आहेत. त्याचबरोबर आपलीच निवड व्हावी म्हणून अनेकजणांनी स्थानिक आमदारांची पत्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तर वरिष्ठ नेत्यांसोबत असणाऱ्या आपल्या गाठीभेटीही वाढविल्याची माहिती आहे.
जिल्हाध्यक्ष निवडीत जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि राज्य नियोजन आयोगाच्या कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांची भूमिकाही तितकीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या निवडी नव्याने होणार आहेत. परिणामी या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती रविवार, दि. २७ जुलै रोजी होणार आहेत. राष्ट्रवादी भवनात सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या मुलाखतीसाठी निरीक्षक म्हणून विद्यार्थी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव आणि सचिव दर्शन सोलवार यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यावेळी इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.

Web Title: Research of 'NCP Student' District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.