साताऱ्यातील आदर्कीत ‘भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात रथोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:19 IST2022-11-17T17:19:25+5:302022-11-17T17:19:47+5:30
तालुक्याबरोबर जिल्हा व जिल्हा बाहेरून भाविक, चाकरमान्यांनी रथासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यामुळे आदर्की बुद्रुक येथे भक्तिमय वातावरण तयार झाले होते.

साताऱ्यातील आदर्कीत ‘भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात रथोत्सव
आदर्की : फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, ढोल-ताशा, तुतारी, गजनृत्य करत भैरवनाथाचा जयघोष करीत आदर्कीच्या ‘भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’ म्हणत रथोत्सव साजरा करण्यात आला.
आदर्की बुद्रुक येथे श्री भैरवनाथ जयंती सोहळा व रथोत्सवानिमित्त अभिषेक, होमहवन, काकड आरती, भजन, कीर्तन, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री भैरवनाथाची मूर्ती पाळण्यात ठेवली व महिलांनी स्वरचित भैरवनाथाचा पाळणा म्हणत भैरवनाथ जन्म सोहळा पार पडला. त्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आले. दुपारी तीन वाजता फुलाने सजवलेला व विद्युत रोषणाई केलेल्या रथामध्ये श्री भैरवनाथ-जोगेश्वरी यांच्या मूर्ती ठेवून रथाचे पूजन केले. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या नवीन ट्रॅक्टरद्वारे रथ ग्रामप्रदक्षिणासाठी सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थ, महिला भाविकांनी गर्दी केली होती.
रथापुढे गजनृत्य, ढोल-ताशा, तुतारी, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत रथ मार्गस्थ होताना प्रत्येक घरापुढे महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून फुलांचा सडा टाकला होता. प्रत्येक घरातील महिला, पुरुष, बाळगोपाळ रथाचे मनोभावे दर्शन घेत होते. रथ भैरवनाथ मंदिर चौक, तिकाटणे, विश्वासराव धुमाळ घर, विठ्ठल मंदिर, मठ, फलटण-सातारा रस्ता येथून मारुती मंदिर अशी ग्रामप्रदक्षिणा घालून मंदिरात आला. त्या ठिकाणी महाआरती होऊन रथाची सांगता झाली.
रथोत्सवामध्ये खेळणी, हॉटेल, मिठाईची दुकाने थाटली होती. तालुक्याबरोबर जिल्हा व जिल्हा बाहेरून भाविक, चाकरमान्यांनी रथासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यामुळे आदर्की बुद्रुक येथे भक्तिमय वातावरण तयार झाले होते. रथोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी रथोत्सव कमिटी, ग्रामस्थ, तरुण मंडळ, पोलीस प्रशासन यांनी परिश्रम घेतले.
आदर्की बुद्रुक येथील रथोत्सवावर भाविकांनी ३७ हजार रुपयांचे तोरण बांधले होते. ग्रामस्थांनी भाविकांची भोजनाची व्यवस्था केली होती.