सातारा : सातारा जिल्ह्यातील १७ पैकी १२ साखर कारखान्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दर जाहीर केले. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील कारखान्यांनी स्पर्धात्मक ३२०० रुपये प्रतिटन दर जाहीर केले असून, इतर कारखान्यांनीही २८०० ते ३००० पर्यंत दर दिले आहेत. अद्यापही पाच कारखान्यांनी दर जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे या कारखान्यांकडून दर कधी जाहीर होणार, या प्रतीक्षेत ऊस उत्पादक शेतकरी आहेत.जिल्ह्यातील साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ऊस दराबाबत बैठका झाल्या आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार, दि. १८ रोजी बैठक झाली होती. यावेळी जयवंत शुगर्स आणि कृष्णा कारखाना वगळता इतर कारखान्यांनी दर जाहीर केले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवार, दि. २३ रोजी पुन्हा बैठक आयोजित केली. यावेळी मुंबई येथे मंत्रालयात बैठकीला जावे लागल्याने जिल्हाधिकारी यांनी दहा मिनिटेच उपस्थित राहू शकले. तथापि, त्यांनी कारखाना व्यवस्थापन आणि शेतकरी संघटनांशी चर्चा केली आणि उर्वरित सर्व कारखान्यांना बैठक संपेपर्यंत दर जाहीर करण्याच्या सूचना केल्या. यावेळी आणखी दहा कारखान्यांनी दर जाहीर केले. त्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत एकूण बारा कारखान्यांनी दर जाहीर केले आहेत, तर किसनवीर भुईंज, किसनवीर खंडाळा, जरंडेश्वर चिमणगाव, अजिंक्यतारा शेंद्रे, प्रतापगड यांनी दर जाहीर करण्यासाठी आणखी एक दिवसाची मुदत मागितली आहे.
विद्यमान मंत्र्यांचे कारखाने काय दर देणार?जिल्ह्यात अजिंक्यतारा आणि किसन वीर या सहकारी कारखान्यांवर कॅबिनेट असलेल्या मंत्र्यांचे पॅनल सत्तेत आहे. या कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती दर दिला जाणार, याची उत्सुकता आहे. जिल्ह्यात जयवंत शुगर्स, कृष्णा, सह्याद्री, अथणी शुगर शेवाळेवाडी तसेच शिवनेरी कारखान्याने ३२०० रुपये स्पर्धात्मक दर दिला आहे. त्यामुळे इतरही कारखान्यांनी चांगला दर देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
साखर कारखान्यांनी जाहीर केलेले दरयशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना - ३२००सह्याद्री साखर कारखाना - ३२००बाळासाहेब देसाई साखर कारखाना - २७००श्रीराम जवाहर - २८५०अथणी शुगर शेवाळेवाडी - ३२००ग्रीन पॉवर गोपूज - ३०००स्वराज उपळवे - २८०१शरयू - २८५०जयवंत शुगर्स - ३२००माण-खटाव पडळ - २९००श्रीदत्त इंडिया - २८५०शिवनेरी साखर - ३२००