सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप, कोयनेत १६ टीएमसी पाणीसाठा
By नितीन काळेल | Updated: July 6, 2023 18:43 IST2023-07-06T18:42:55+5:302023-07-06T18:43:17+5:30
धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप, कोयनेत १६ टीएमसी पाणीसाठा
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून सध्या उघडझाप सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजालाच सर्वाधिक ३१ मिलिमीटर पाऊस पडला. तर, कोयना धरणातील पाणीसाठा १६.०९ टीएमसी झाला होता.
जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. मागील दहा दिवस पाऊस पडत आहे. पण, पूर्व भागात अत्यल्प पाऊस पडला. तर पश्चिम भागात सुरुवातीला दमदार पाऊस झाला. त्यानंतर चार दिवसांपासून जोर कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर, नवजा येथे ३१ आणि महाबळेश्वरला १४ मिलिमीटर पाऊस पडला.
तर, एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ६२४, नवजा येथे ९०४ आणि महाबळेश्वरला १ हजार २५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर गुरुवारी सकाळी कोयना धरणात ३ हजार ७९२ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून पाणीसाठ्याने १६ टीएमसीचा टप्पा पार केला आहे. तसेच इतर प्रमुख धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ हळूहळू होत आहे.