पावसाची उघडझाप; कोयना धरणात ७१ टीएमसी पाणीसाठा
By नितीन काळेल | Updated: July 30, 2023 13:21 IST2023-07-30T13:07:37+5:302023-07-30T13:21:16+5:30
१५ दिवस संततधार : महाबळेश्वरला ८५ मिलीमीटरला पाऊस

पावसाची उघडझाप; कोयना धरणात ७१ टीएमसी पाणीसाठा
नितीन काळेल
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील १५ दिवस संततधार असणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला असून सध्या तर उघडझाप सुरू आहे. त्यामुळे रविवारच्या सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरलाच ८५ मिलीमीटर पडला. तर पाऊस कमी झाल्याने कोयना धरणातील पाण्याची आवकही कमी झाली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ७०.७४ टीएमसी पाणीसाठा झाला होता.
मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊन एक महिना झाला आहे. आतापर्यंत पश्चिम भागातच चांगला पाऊस झालेला आहे. तर पूर्व भागात प्रतीक्षा कायम आहे. त्यातच पुरेसा पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरणीही खोळंबली. परिणामी यावर्षी खरीपाची पेरणी कमी आहे. तर पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा तसेच महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडला. त्यामुळे भात लागणीची कामे पूर्णत्वास जात आहे. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तापोळासह कोयना धरणातीलपाणीसाठ्यातही मोठी वाढ झालेली आहे. त्यातच मागील १५ दिवसांत पश्चिमेकडे संततधार होती. त्यामुळे प्रमुख सर्वच धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांच्यावर पोहोचलाय. यामुळे काही प्रमाणात चिंता मिटलेली आहे.
पश्चिम भागात संततधार असणाऱ्या पावसाचा जोर कमी झालेला आहे. शनिवारपासून तर उघडझाप सुरू आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला अवघा ३७ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ८२ आणि महाबळेश्वरला ८५ मिलीमीटरची नोंद झाली. एक जूनपासूनचा विचार करता कोयनानगर येथे २६६६ तर नवजाला ३७८३ आणि महाबळेश्वरला ३५५१ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत या ठिकाणी यंदा चांगला पाऊस झालेला आहे. तर सकाळच्या सुमारास कोयना धरणात १८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीसाठा ७०.७४ टीएमसी झालेला. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.