सार्वजनिक बांधकाममंत्री अडकले कोरेगावातील वाहतूक कोंडीत; कंपनीला सूचना देऊनही सुधारणा नाही, काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:54 IST2025-11-08T17:50:48+5:302025-11-08T17:54:29+5:30
कोरेगावला रिंगरोडची गरज : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्पष्ट भूमिका

सार्वजनिक बांधकाममंत्री अडकले कोरेगावातील वाहतूक कोंडीत; कंपनीला सूचना देऊनही सुधारणा नाही, काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू
कोरेगाव : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता गंभीर वळणावर आला आहे. ऊस वाहतुकीमुळे निर्माण होणारी रहदारी केवळ नागरिकांसाठीच नव्हे तर मंत्र्यांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अकलूजहून साताऱ्याकडे निघाले असताना आझाद चौक, डीके ऑइल मिल परिसरात काही वेळ वाहतूक कोंडीत अडकले. त्यांच्या वाहनांचा ताफा पूर्णतः ठप्प झाल्याने वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली.
या घटनेनंतर मंत्री भोसले यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की, ‘होय, मी कोरेगावात वाहतूक कोंडीत अडकलो होतो. कोरेगावातील रस्ता अरुंद असून, तो राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. ठेकेदार कंपनीने योग्य पद्धतीने काम केले नाही. वारंवार सूचना देऊनही सुधारणा झालेली नाही, त्यामुळे त्या कंपनीकडून काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.’
त्यांनी पुढे सांगितले की, ‘कोरेगाव शहरासाठी रिंगरोड आता काळाची गरज आहे, अपरिहार्यता देखील आहे. गेल्या वर्षी पुसेगाव येथे झालेल्या सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या यात्रेच्या वेळीही मी हा मुद्दा मांडला होता. जर स्थानिक आमदार महेश शिंदे यांनी पुढाकार घेऊन नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांची मानसिकता तयार केली, तर रिंगरोडमुळे कोरेगावची वाहतूक समस्या कायमस्वरूपी मिटू शकेल.’
सध्या कोरेगावमधील रस्ता काँक्रीट करण्यात आला असला तरी तो मुळातच लहान आहे. आता तो आणखी रुंद करणे शक्य नाही. भविष्यातील वाढती रहदारी लक्षात घेता रिंगरोड हा एकमेव पर्याय असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरेगाव शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे केवळ चारच कर्मचारी आहेत. रात्रगस्त, साप्ताहिक सुट्टी व इतर जबाबदाऱ्यांमुळे प्रत्यक्ष रस्त्यावर दोन ते तीन कर्मचारीच ड्युटीवर असतात. सातारा, सांगली व परिसरातील तब्बल बारा साखर कारखान्यांची ऊस वाहतूक कोरेगावातूनच होत असल्याने सुमारे १४० दिवस शहर ठप्प राहते. नागरिक त्रस्त झाले असून, रिंगरोडचा विषय आता केवळ चर्चेपुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवावा, अशी मागणी वाढू लागली आहे.