प्रिन्स, टिंकूच्या कामगिरीचे कुतूहल
By Admin | Updated: January 5, 2015 00:45 IST2015-01-04T21:29:24+5:302015-01-05T00:45:21+5:30
पोलीस उन्नत दिन : कऱ्हाडला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात बॉम्बशाधक-नाशक पथकाचे प्रात्यक्षिक

प्रिन्स, टिंकूच्या कामगिरीचे कुतूहल
कऱ्हाड : अनेक बॅगेमधून बॉम्ब असणाऱ्या नेमक्या बॅगचा शोध घेणारा ‘प्रिन्स’, चोर संशयितांचा शोध घेणाऱ्या ‘टिंकू’ या श्वानांच्या कामगिरीचे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी कुतूहल व्यक्त केले़ निमित्त होते महाराष्ट्र पोलीस उन्नत दिनानिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित बॉम्बशोधक व नाशक पथकातर्फे सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचे़ प्रिन्स व टिंकू या श्वानांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकांना प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी दाद दिली़
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ पी़ एम़ खोडके, प्रा़ एस़ के़ पाटील, प्रा़ उमेश देशपांडे, प्रा़ डॉ़ एम़ एऩ हेडावू आदींच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले़ महाविद्यालयाच्या प्रांगणात या पथकाने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली़ सभोवताली विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती़
यावेळी बॉम्बशोधक पथकात कार्यरत असणाऱ्या प्रिन्स श्वानानेही महाविद्यालयाच्या प्रांगणात टाकण्यात आलेल्या बॅगांमधून स्फोटके असलेली बॅग शोधून काढली़ फौसदार एस़ पी़ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौसदार वाय़ ए़ मुलाणी, हवालदार हणमंत शिंदे, आऱ टी़ शेळके, एच़ टी़ शिवणकर, गजानन मोरे, एऩ एस़ शिनगारे, यांनी ही प्रात्यक्षिके सादर केली़ यावेळी शिंदे यांनी सार्वजनिक ठिकाणी अनोळखी वस्तूला हात न लावता पोलिसांना माहिती देण्यासह घ्यावयाची काळजी यासंदर्भात माहितीही दिली़ (प्रतिनिधी)
वासावरून शोध
या वेळी संशयितांना पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पोलिसांनी उपस्थितांपैकी एका प्राध्यापकाच्या रूमालाचा, तसेच एका विद्यार्थ्यांच्या जर्किनचा वास टिंकू श्वानास दिला़ गर्दीतूनही टिंकूने त्या रूमाल घेतलेल्या प्राध्यापक व संबंधित विद्यार्थ्याला शोधून काढले़ टिंकूच्या या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले़